पंतप्रधान मोदी-राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची मैत्री खरी आहे
भारताशी भागीदारी अत्यावश्यक, गोर यांचे वक्तव्य : व्यापार करार चर्चेला पुन्हा होणार प्रारंभ, अडचणी दूर होण्याची शक्यता
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील मैत्री खरीखुरी असून भारत हा अमेरिकेचा अत्यावश्यक भागीदार आहे, असे स्पष्ट प्रतिपादन अमेरिकेचे भारतातील नवनियुक्त राजदूत सर्जियो गोर यांनी केले आहे. त्यांनी आज आपल्या कामाची सूत्रे स्वीकारली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प लवकरच भारताचा दौरा करणार आहेत. तसेच अमेरिकेच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या ‘पॅक्स सिलिका’ या गटात समाविष्ट होण्यासाठी भारताला लवकरच आमंत्रण देण्यात येईल, अशी महत्त्वपूर्ण माहितीही सर्जियो गोर यांनी यावेळी दिली.
‘अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमवेत मी जगभर प्रवास केला आहे. त्यामुळे मी निश्चितपूर्वक हे स्पष्ट करू इच्छितो, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी त्यांचे असणारे जवळीकीचे संबंध हे खरेखुरे आहेत. तसेच, या दोन्ही नेत्यांमधील संपर्क हा उत्युच्च राजनैतिक पातळीवरचा आहे. खऱ्या मित्रांमध्ये काहीवेळा मतभेद होतात. तथापि, ते या मतभेदांवर मात करतात. अमेरिका हा जगातील सर्वात जुना गणतंत्रीय देश आहे, तर भारत हा जगातील सर्वात मोठा गणतंत्रीय देश आहे. अमेरिकेचा भारतातील राजदूत या नात्याने, या दोन्ही देशांमधील परस्पर संबंध पुढच्या घनिष्ट पातळीवर नेणे हे माझे ध्येय आहे, असे प्रतिपादन गोर यांनी केले.
भारताला मध्यवर्ती स्थान
अमेरिकेच्या परराष्ट्रीय धोरणात भारताला मध्यवर्ती स्थान आहे. अमेरिकेसाठी भारताची भागीदारी अत्यावश्यक आहे. दोन्ही देशांची धोरणात्मक भागीदारी बळकट आहे. सामर्थ्य, नेतृत्व आणि परस्परांविषयी असणारा सन्मान हे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील संबंधांचे सूत्र आहे. दोन्ही देशांची एकमेकांशी चर्चा सातत्याने होत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
अध्यक्ष ट्रम्प भारतात येणार
अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प निश्चितपणे भारताच्या दौऱ्यावर येणार नाहीत. यावर्षी किंवा पुढच्या वर्षी ते भारतात येतील. त्यांनी स्वत:च हा संकेत नुकत्याच केलेल्या एका वक्तव्यात दिला आहे. या वक्तव्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारत यांच्याविषयी आस्था आणि आदर व्यक्त केला आहे. त्यामुळे दोन्ही देशांना एकमेकांच्या साहाय्याने पुढची वाटचाल करण्याची भरपूर संधी उपलब्ध आहे. माझेही यासंबंधात उत्तरदायित्व आहे, असे आश्वासक प्रतिपादन त्यांनी केले आहे.
‘पॅक्स सिलिका’त भारताचा समावेश…
अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक साधने आणि वाहन निर्मितीसाठी अत्यावश्यक असणारे दुर्मिळ धातू, तसेच उच्चतांत्रिक उत्पादने यांच्या संदर्भात अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पुढाकाराने स्थापन करण्यात आलेल्या ‘पॅक्स सिलिका’ या आंतरराष्ट्रीय गटात भारताचाही समावेश असावा, अशी अमेरिकेची इच्छा असून भारताला त्यासाठी आमंत्रण दिले जाईल. दुर्मिळ धातूंच्या पुरवठा साखळ्या सुरक्षित ठेवण्यासाठी या गटाची भूमिका महत्त्वाची असेल, असेही गोर यांनी स्पष्ट केले.
आजपासून पुन्हा व्यापार करार चर्चा
भारत आणि अमेरिका यांच्यातल्या संबंधांमधील सर्वात महत्त्वाचा मुद्दा ‘व्यापार करार’ हा आहे. गेले जवळपास वर्षभर दोन्ही देशांमध्ये एक समतोल, उभयपक्षी लाभदायक आणि सन्मानजनक व्यापार करार करण्याविषयी चर्चा होत आहे. तथापि, काही महत्त्वाच्या प्रश्नांवर ही चर्चा अडकली असल्याने व्यापार करार प्रत्यक्षात येण्यात अडचणी निर्माण होत आहेत. तथापि, आज मंगळवारपासून (13 जानेवारी 2026) व्यापार करार चर्चेला पुन्हा प्रारंभ करण्यात येणार आहे, अशी महत्त्वाची माहिती सर्जियो गोर यांनी दिली. या माहितीमुळे या व्यापार करारासंबंधात पुन्हा एकदा आशादायक वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येते.
‘पॅक्स सिलिका’ काय आहे…
‘पॅक्स सिलिका’ हा अमेरिकेच्या पुढाकाराने आणि अमेरिकेच्या नेतृत्वात स्थापन झालेला जागतिक धोरणात्मक गट आहे. इलेक्ट्रॉनिक उद्योग आणि वाहन उद्योगासाठी अत्यावश्यक असणारे दुर्मिळ धातू किंवा रेअर अर्थस् तसेच सिलिकॉन यांचा पुरवठा नेहमी विनाअडथळा आणि सुरळीत होत रहावा, यासाठी हा गट कार्यरत आहे. अत्याधुनिक उत्पादन तंत्रज्ञान, ऊर्जा निर्मिती आणि तत्सम क्षेत्रात हा गट महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. सेमीकंडक्टर्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानासाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्मितीच्या क्षेत्रातही या गटाचा महत्त्वाचा सहभाग असेल. सध्या भारताचा समावेश या गटात करण्यात आलेला नाही. तथापि, अमेरिकेचे भारतातील राजदूत सर्जियो गोर यांच्या म्हणण्यानुसार भारताला या गटात समाविष्ट होण्याचे आमंत्रण दिले जाणार आहे. भारताचा या गटात समावेश झाला, तर ती भारतासाठी अत्यंत महत्त्वाची उपलब्धी असेल. भारताच्या आर्थिक विकासाला आणि संशोधनकार्याला या समावेशामुळे बळ मिळणार आहे. सध्या या गटात अमेरिका, जपान, दक्षिण कोरिया, सिंगापूर, नेदरलंडस्, ब्रिटन, इस्रायल, संयुक्त अरब अमिरात आणि ऑस्ट्रेलिया अशा 9 देशांचा समावेश आहे.
पुन्हा आशावाद जागृत
ड सर्जियो गोर यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा व्यापार कराराच्या आशा पल्लवित
ड अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारताच्या दौऱ्याविषयीही अनुकूलता
ड ‘पॅक्स सिलिका’त भारताच्या प्रवेशाचे संकेत, भारतासाठी हा प्रवेश महत्त्वाचा
Comments are closed.