IND vs NZ – सुंदर जायबंदी; बदोनीला संधी, हिंदुस्थानला वन डे मालिकेत दुखापतीचे ग्रहण
न्यूझीलंडविरुद्धच्या वन डे मालिकेत हिंदुस्थानी क्रिकेट संघाच्या अडचणी वाढतच चालल्या आहेत. पहिल्या सामन्यात दुखापतग्रस्त ठरलेला अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर आता संपूर्ण मालिकेतून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी युवा फलंदाज आयुष बदोनीला थेट संघात संधी देण्यात आली असून, 14 जानेवारीला होणाऱया दुसऱया वन डेसाठी तो राजकोट येथे संघात दाखल होणार आहे.
वडोदरा येथे झालेल्या पहिल्या वन डे सामन्यादरम्यान सुंदरच्या बरगडय़ांना ताण बसला. बीसीसीआयने स्पष्ट केले की, डाव्या बाजूच्या खालच्या बरगडीत वेदना जाणवल्यानंतर सुंदरला स्पॅनसाठी पाठवण्यात आले आहे. त्याच्या दुखापतीवर आता वैद्यकीय तज्ञांचा सल्ला घेतला जाणार आहे. 26 वर्षीय सुंदरने पहिल्या सामन्यात 5 षटकांत 27 धावा देत गोलंदाजी केली होती, मात्र न्यूझीलंडच्या डावादरम्यान अचानक बरगडय़ांमध्ये ताण जाणवल्याने तो मैदानाबाहेर गेला. त्यानंतर तो क्षेत्ररक्षणासाठी परतलाच नाही. विशेष म्हणजे, दुखापत असूनही तो फलंदाजीसाठी मैदानात उतरला.
दुखापतीतही लढला
न्यूझीलंडकडून मिळालेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना वॉशिंग्टन सुंदर आठव्या क्रमांकावर फलंदाजीस उतरला. त्याने नाबाद 7 धावा करत केएल राहुलसोबत 16 चेंडूंमध्ये 27 धावांची निर्णायक भागीदारी केली. राहुल 29 धावांवर नाबाद राहिला. हिंदुस्थानने 49 षटकांत 6 बाद 306 धावा करत सामना चार विकेट्सने जिंकला.
Comments are closed.