पश्चिम रेल्वे मार्गावर उद्या, परवा मोठा ब्लॉक; तब्बल 288 लोकल फेऱ्या रद्द

पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांचे हाल संपण्याचे नावच घेताना दिसत नाही. आणखी आठवडाभर प्रवाशांना त्रास सहन करावा लागणार आहे. कांदिवली आणि बोरिवली स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी पश्चिम रेल्वेने बुधवारी आणि गुरुवारी रात्री पुन्हा मोठा ब्लॉक घेतला आहे. ब्लॉकमुळे दोन दिवसांत तब्बल 288 लोकल फेऱ्या रद्द केल्या जाणार आहेत. तसेच गुजरातहून येणाऱ्या काही एक्सप्रेस वसईपर्यंत चालवण्यात येणार आहेत. त्यामुळे चाकरमान्यांच्या त्रासात आणखी वाढ होणार आहे.
कांदिवली आणि बोरिवलीदरम्यान सहाव्या मार्गिकेचे बांधकाम सुरू आहे. यासाठी पश्चिम रेल्वेने 20 डिसेंबर 2025 रोजीच्या रात्रीपासून 30 दिवसांचा ब्लॉक जाहीर केला आहे. हा ब्लॉक 18 जानेवारीपर्यंत राहणार आहे. या दरम्यान अनेक लोकल फेऱ्या रद्द करण्यात येत आहेत. कांदिवली आणि मालाड स्थानकांदरम्यान पॉइंट 103 तोडण्यासाठी 13 जानेवारीच्या रात्री 12 ते पहाटे 5.30 वाजेपर्यंत अप फास्ट मार्गावर, तर डाउन फास्ट मार्गावर मध्यरात्री 1 ते 4.30 वाजेपर्यंत ब्लॉक असेल. याव्यतिरिक्त 14 जानेवारीला अप जलद मार्गांवर रात्री 12 ते पहाटे 5.30 वाजेपर्यंत तसेच डाउन जलद मार्गांवर मध्यरात्री 1 ते पहाटे 4.30 पर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे दिवसा देखील अनेक लोकल फेऱ्या रद्द करण्यात येत आहेत.
दोन्ही दिवशी प्रत्येकी 144 लोकल फेऱ्या रद्द केल्या जाणार असून त्यात प्रत्येकी 10 एसी लोकल फेऱ्यांचा समावेश आहे. तसेच नंदुरबार-बोरिवली आणि अहमदाबाद-बोरिवली एक्सप्रेस या लांब पल्ल्याच्या गाड्या वसई स्थानकापर्यंतच चालवण्यात येणार आहेत. दोन दिवसांत अप आणि डाऊन मार्गावरील तब्बल 288 लोकल फेऱ्या रद्द होणार असल्याने प्रवाशांची प्रचंड गैरसोय होणार आहे.

Comments are closed.