Breakfast Plan For Wight Loss: वजन कमी करायचंय? फॉलो करा हा आठवड्याचा ब्रेकफास्ट प्लॅन
नाश्ता हा आपल्या दैनंदिन दिनचर्येचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो. रात्रीच्या झोपेनंतर शरीराला ऊर्जेची गरज असते, त्यामुळं नाश्ता करणे आरोग्यासाठी महत्त्वाचे असते. पोषणतज्ञ सांगतात, नाश्ता करण्याची योग्य वेळ सकाळी ७ ते ९ दरम्यान असते. तसेच नाश्त्यात नेहमी हलके आणि प्रथिनेयुक्त पदार्थ असले पाहिजेत. यामुळे चयापचय वाढतो आणि शरीराला भरपूर ऊर्जा मिळते. त्यातच जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर काही पदार्थ सकाळी नाश्त्याला घेतल्याने फायदा होतो. चला तर मग काही हेल्दी ब्रेकफास्टचे पदार्थ जाणून घेऊया..
पोहे
प्रथिनेयुक्त पोहे वजन कमी करण्यासाठी खूप उपयुक्त असतात. पोहे बनवताना त्यात भरपूर भाज्या जसे की, गाजर, मटार, बीन्स आणि शेंगदाणे वापरा. तसेच त्यात उकडलेले चणे घाला. यामुळे फायबर आणि प्रोटीनचे प्रमाण वाढते. चणे प्रथिनने समृद्ध असतात, जे स्नायूंना मजबूत करतात, तर पोहे ग्लूटेन-मुक्त असतात आणि लोह, फायबर आणि कार्बोहायड्रेट्सचा उत्तम स्रोत असतात.
उपमा किंवा सांजा
वजन कमी करण्यासाठी नाश्त्यात रव्यापासून बनवलेला उपमा हा एक उत्तम पर्याय आहे. रवा हा उर्जेचा चांगला स्रोत आहे. यात भरपूर भाज्या घातल्यास आणखी फायदा होतो. तसेच पांढऱ्या रव्याऐवजी ब्राऊन रवा किंवा दलियाचा उपमा खाणे अधिक फायदेशीर ठरते. यात आलं आणि कढीपत्ता घातल्यास पचनशक्ती सुधारते.
मूग डाळीचे धिरडे किंवा डोसा
प्रथिनांनी भरपूर असलेला हा पदार्थ कमी कमी करणाऱ्यांसाठी सर्वोत्तम आहे. मूग डाळ पचायला हलकी असते आणि रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करते. मूग डाळीचा डोसा बनवताना त्यात किसलेले पनीर किंवा कोथिंबीर घातल्यास चवीत भर पडतेच शिवाय पोषण वाढते.
इडली
इडली संपूर्ण भारतात लोकप्रिय आहे. इडली ही वाफेवर शिजवली जाते, त्यामुळे त्यात फॅट्स कमी असतात. आंबवलेल्या पीठामुळे हे पोटाच्या आरोग्यासाठी उत्कृष्ट आहे. तुम्ही नाचणी, रवा किंवा ओटसची इडलीही बनवू शकता. तसेच सांबारमध्ये विविध भाज्यांचा वापर केल्याने जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात मिळतात.
थालीपीठ
मल्टीग्रेन पिठांपासून तयार केलेले थालीपीठ हे पौष्टिकतेचे भांडार आहे. भाजणीत (ज्वारी, बाजरी, चणा डाळ, गहू) वापरले जातात, ज्यामुळे शरीराला लोह आणि फायबर मिळते. थालीपीठ भाजताना कमी तेल किंवा तुपाचा वापर करा. तसेच ते दह्याचा खाल्ल्यास फायदा होतो.
ओट्सचा उपमा
रव्याचा उपमा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही ओट्सचा उपमाही करू शकता. ओट्स वापरल्याने भरपूर फायबर मिळते, जे पोटाची चरबी कमी करण्यास उपयुक्त ठरते. यात गाजर, मटार, टोमॅटोसारख्या भरपूर भाज्या घातल्यास आरोग्याला अधिक फायदा होतो.
मोड आलेल्या कडधान्यांची भेळ
हे प्रथिनांचे उत्तम स्रोत असून यात अजिबात तेल नसते. मोड आलेले कडधान्य वाफवून त्यात कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, चाट मसाला घालून हा पदार्थ झटपट बनतो. ही ‘प्रोटीन पॉवर’ डिश तुम्हाला दिवसभर सक्रिय ठेवण्यास फायदेशीर आहे.
Comments are closed.