एका वेळी दोन वॉर्डांची मतमोजणी, ‘सामना’च्या बातमीनंतर आयोगाला जाग

पालिका निवडणुकीसाठी आता एका वेळी दोन वॉर्डांची मतमोजणी करण्यात येणार आहे. मतमोजणी केंद्राजवळ प्रचंड गर्दीमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून हा निर्णय घेतला आहे. याबाबत दैनिक ‘सामना’ने ‘मतमोजणी रखडणार’ अशी बातमी 10 जानेवारीला दिली होती. यानंतर राज्य निवडणूक आयोगाने एका वेळी दोन वॉर्डांची मतमोजणी करण्याचे निर्देश दिले आहेत.

मुंबईसह राज्यातील 29 महापालिकांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होत असून दुसऱया दिवशी सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार आहे. याआधी झालेल्या निवडणुकांमध्ये मुंबईत 227 प्रभागांसाठी 23 विभाग निवडणूक कार्यालये तैनात करण्यात आली आहेत. या 23 विभाग निवडणूक कार्यालयांतर्गत आठ ते दहा प्रभागांच्या मतमोजणीची जबाबदारी असेल. मात्र या ठिकाणी एकावेळी एकाच वॉर्डची मतमोजणी करण्याचे नियोजन करण्यात आले होते. या पद्धतीमुळे निकाल जाहीर करण्यास मध्यरात्र होणार होती. मात्र आता एकावेळी दोन वॉर्डची मतमोजणी करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.

दुपारी चार वाजेपर्यंत निकाल स्पष्ट होणार

एकावेळी दोन वॉर्डची तपासणी केल्यामुळे दुपारी चार वाजेपर्यंत सर्व निकाल स्पष्ट होतील, असा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. दरम्यान, मतदानासाठी 12 पुराव्यांमधील एका पुराव्याचा समावेश आहे. यामध्ये फोटो असलेले ओळखपत्र दाखवावे लागणार आहे. मतदार ओळखपत्र नसल्यास पासपोर्ट, आधारकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅनकार्ड, केंद्र शासन, राज्य शासन, सार्वजनिक उपक्रम, स्थानिक स्वराज्य संस्था यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना फोटोसह दिलेली ओळखपत्रे, राष्ट्रीयीकृत बँका अथवा टपाल खात्यामधील खातेदाराचे छायाचित्र असलेले पासबुक आदी पुरावे ग्राह्य धरले जाणार आहेत.

Comments are closed.