टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममध्ये वाद?; कोच म्हणाला, रोहित-विराट आणि गंभीर…
टीम इंडिया रिफ्ट अफवा : टीम इंडियाचे हेड कोच गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) यांच्यात सर्व अबोला आहे, दोघे एकमेकांना पसंत करत नाहीत, इतकंच नाही तर ते परस्परांशी बोलतही नाहीत. अशा अफवा आणि अटकळी सोशल मीडियावर सातत्याने फिरत होत्या. मात्र आता ड्रेसिंग रूममधून आलेल्या एका ठोस प्रतिक्रियेमुळे या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक सितांशु कोटक यांनी विराट-गंभीर यांच्या नात्यावर स्पष्ट आणि मोठं विधान केलं आहे.
भारतीय संघात विराट कोहली, रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यात कोणतीही फुट पडली नाही, अशा सर्व अटकळींना सितांशु कोटक यांनी साफ फेटाळलं आहे. त्यांनी सांगितलं की, हे दोन्ही अनुभवी खेळाडू संघाच्या दीर्घकालीन योजनांमध्ये पूर्णपणे सहभागी आहेत. पुढील वर्षी होणाऱ्या विश्वचषकाची तयारी आणि भारताची वनडे रणनीती आखण्यात विराट आणि रोहित यांची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे.
फलंदाजी प्रशिक्षक सितांशु कोटक काय म्हणाले?
न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडेपूर्वी बोलताना कोटक म्हणाले, “ते दोघं सातत्यानं रणनीतीवर चर्चा करतात. आता दोघंही एकाच फॉर्मॅटमध्ये खेळत असल्यामुळे भारताने प्रत्येक सामना जिंकावा, अशी त्यांची इच्छा आहे. त्यांच्या अनुभवाचा फायदा इतर खेळाडूंना होतो. ते आपले विचार शेअर करतात, चर्चा करतात. वनडे फॉर्मॅटबाबत ते गौतम गंभीरसोबत बोलतात, दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या विश्वचषकासाठीची रणनीतीही ठरवतात. मी अनेकदा तिथे उपस्थित असतो आणि त्यांच्या चर्चांचा साक्षीदार असतो. सोशल मीडियावर बरंच काही दिसतं, पण मी त्याकडे लक्ष देत नाही. माझ्या दृष्टीने सगळं वातावरण अतिशय सकारात्मक आहे.”
गेल्या काही महिन्यांपासून कोहली, रोहित आणि नव्या कोचिंग स्टाफमधील समीकरणांवर जोरदार चर्चा सुरू होती. यावरही कोटक यांनी भाष्य केलं. ते म्हणाले की, मार्चमध्ये टी-20 विश्वचषक संपल्यानंतर भारताला आपल्या फलंदाजीवर नव्याने काम करावं लागेल, कारण 34 षटकांनंतर नव्या चेंडूच्या नियमाचा परिणाम खेळावर होणार आहे. परिस्थिती बदलल्यानंतर 35व्या ते 50व्या षटकांदरम्यान गोलंदाजी करणाऱ्या संघाला दोन चेंडूपैकी एक निवडण्याचा पर्याय असेल, आणि त्यानुसार फलंदाजीची रणनीती आखावी लागेल.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.