IPL 2026: आरसीबीचे दोन होम सामने आता ‘या’ शहरात खेळवले जाणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा!

आयपीएल 2026 पूर्वी गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु (RCB) संघाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. आतापर्यंत बेंगळुरुतील एम. चिन्नास्वामी स्टेडियम हे आरसीबीचे घर मानले जात होते. मात्र आगामी हंगामात आरसीबीला आपले होम व्हेन्यू बदलावे लागणार आहे. सुरक्षेच्या कारणांमुळे बेंगळुरुमध्ये सामने आयोजित करणे सध्या शक्य नसल्याने फ्रँचायझीने नवीन ठिकाणांचा शोध सुरू केला आहे.

आयपीएल 2025 जिंकल्यानंतर आरसीबी संघ बेंगळुरु येथे पोहोचला असताना स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत 11 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेनंतर एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर व्यावसायिक क्रिकेट सामन्यांच्या आयोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. याच कारणामुळे वुमेन्स वर्ल्ड कप 2025 आणि टी20 वर्ल्ड कप 2026 यजमानपदही या स्टेडियमला मिळाले नाही.

या पार्श्वभूमीवर आरसीबीने आयपीएल 2026 साठी पर्यायी होम व्हेन्यू निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. याचाच एक भाग म्हणून छत्तीसगडची राजधानी रायपूर आरसीबीसाठी महत्त्वाचे ठिकाण ठरणार आहे. छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साई यांनी मंगळवार, 13 जानेवारी रोजी अधिकृतपणे जाहीर केले की आयपीएल 2026 मध्ये आरसीबीचे दोन होम सामने रायपूरमध्ये खेळवले जातील.

मुख्यमंत्री विष्णुदेव साई आणि आरसीबीचे सीईओ राजेश मेनन यांच्यात झालेल्या बैठकीनंतर ही घोषणा करण्यात आली. या बैठकीत बीसीसीआयचे संयुक्त सचिव प्रभतेज सिंग भाटिया देखील उपस्थित होते. मुख्यमंत्री साई यांनी सांगितले की, रायपूरमधील शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियम येथे सामने आयोजित करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली असून आवश्यक सोयीसुविधांवरही विचार करण्यात आला आहे.

दरम्यान, आरसीबीचे उर्वरित सामने नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये होण्याची शक्यता आहे. पुण्यातील एमसीए स्टेडियमचाही विचार करण्यात आला होता, मात्र तेथे राजस्थान रॉयल्स आपले होम सामने खेळू शकते. उल्लेखनीय बाब म्हणजे रायपूरमध्ये याआधी 2013 मध्ये एक आयपीएल सामना झाला होता. त्यामुळे तब्बल 13 वर्षांनंतर रायपूर पुन्हा आयपीएलचे यजमानपद भूषवणार आहे.

Comments are closed.