Ravindra Dhangekar Pune : पुणे शहराचा डान्सबार होऊ देणार नाही, धंगेकरांची भाजपवर टीका
पुणे : मी कोणावरही वैयक्तिक टीका करत नाही, तर ती त्यांच्या विकृतीवर असते. पुण्याचे सांस्कृतिक महत्त्व टिकवणे ही आपली जबाबदारी आहे आणि मी कोणत्याही परिस्थितीत पुण्याचा ‘डान्सबार’ होऊ देणार नाही,” अशा शब्दांत रवींद्र धंगेकर यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. आगामी काळातही चुकीच्या प्रवृत्तींविरुद्ध आपली ही टीका सुरूच राहील, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
भाजपवर निशाणा, व्हिडिओंचा दिला पुरावा
पुणे शहरात सध्या सुरू असलेल्या काही अनधिकृत आणि चुकीच्या कामांबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. “भारतीय जनता पक्षाचे काही लोक शहरात वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन चुकीची कामं करत आहेत. मी केवळ आरोप करत नाहीये, तर त्यांच्याच कृत्यांचे व्हिडिओ मी पुराव्यासाहित सोशल मीडियावर शेअर करत आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. या कामांना आळा घालण्याची जबाबदारी प्रशासनाची आणि लोकप्रतिनिधींची असल्याचे त्यांनी नमूद केले.
मुरलीधर मोहोळ आणि चंद्रकांत पाटलांना शुभेच्छा, पण…
यावेळी त्यांनी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांना शुभेच्छा दिल्या. मात्र, मोहोळ यांच्याकडे मागणी करताना ते म्हणाले की, “पुण्यातील चुकीची कामं त्यांनी तातडीने रोखायला हवीत. शहराची प्रतिमा मलीन होणार नाही आणि पुण्याचा डान्सबार होणार नाही, हीच आमची त्यांच्याकडून अपेक्षा आहे.”
‘अजित पवार दमदार नेते’
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल बोलताना त्यांनी भरभरून कौतुक केले. “अजित पवार हे एक दमदार नेते आहेत. ते कार्यकर्त्यांना कधीही फसवत नाहीत आणि शब्दाचे पक्के आहेत. त्यांच्या याच कार्यपद्धतीमुळे मी त्यांना मनापासून गोड शुभेच्छा देतो,” अशा शब्दांत त्यांनी पवारांच्या नेतृत्वशैलीवर विश्वास व्यक्त केला.
Comments are closed.