कुछ बडा होने वाला है! अमेरिकेनंतर हिंदुस्थानने आपल्या नागरिकांना तातडीने इराण सोडायला सांगितलं, आखतात युद्धाचे ढग दाटले

इराणमध्ये वाढत्या प्रादेशिक तणाव आणि निदर्शनांमुळे सुरक्षा परिस्थिती बिकट होत चालली आहे, त्यामुळे केंद्र सरकारने बुधवारी इराणमधील हिंदुस्थानी नागरिकांना शक्य तितक्या लवकर देश सोडण्याचे आवाहन करत अ‍ॅडव्हायझरी जारी केली आहे. तेहरानमधील हिंदुस्थानी दूतावासाने ही अ‍ॅडव्हायझरी जारी केली आहे.

अ‍ॅडव्हायझरीमध्ये लिहिलं आहे की, हिंदुस्थानी पर्यटकांना व्यावसायिक उड्डाणांसह उपलब्ध वाहतुकीच्या पद्धतींनी इराण सोडण्याचा सल्ला देण्यात येत आहे. इराणमध्ये सुरू असलेल्या सरकारविरोधी निदर्शनांमुळे परिस्थिती दिवसेंदिवस खराब होत चालली आहे. या निदर्शनांमध्ये आतापर्यंत २,५०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. ज्यात प्रामुख्याने प्रदर्शनकर्ते आणि काही सुरक्षा दलांचे जवान आहेत.

मदतीसाठी हिंदुस्थानी दूतावासाने आपत्कालीन हेल्पलाइन सक्रिय केल्या आहेत आणि कॉन्सुलर मदतीसाठी अनेक संपर्क क्रमांक आणि अधिकृत ईमेल आयडी शेअर केले आहेत. यासोबतच ज्या हिंदुस्थानी नागरिकांनी द्याप दूतावासात नोंदणी केलेली नाही, त्यांना परराष्ट्र मंत्रालयाच्या ऑनलाइन पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. इराणमध्ये इंटरनेटचा वापर खंडित झाल्यास हिंदुस्थानातील कुटुंबांना त्यांच्या वतीने नोंदणी पूर्ण करण्याची विनंती करण्यात आली आहे.

Comments are closed.