मेग लॅनिंगचा धमाका! हरमनप्रीत कौरचा सर्वात मोठा विक्रम मोडीत काढत रचला नवा इतिहास

महिला प्रीमियर लीग 2026 स्पर्धेत एकापेक्षा एक रोमांचक सामने पाहायला मिळाले आहेत. या स्पर्धेतील सातवा सामना यूपी वॉरियर्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांमध्ये सुरू आहे. या सामन्यात यूपी वॉरियर्सचा संघ नाणेफेक गमावून पहिल्या डावात फलंदाजी करण्यासाठी उतरला आहे. प्रथम फलंदाजी करताना यूपी वॉरियर्सला सुरूवातीलाच मोठा धक्का बसला. किरण नवगिरे शून्यावर माघारी परतली. पहिल्याच षटकात स्फोटक फलंदाज माघारी परतल्यानंतर कर्णधार मेग लॅनिंगवर डाव सांभाळण्याची मोठी जबाबदारी होती. तिने डाव सांभाळला आणि महिला प्रीमियर लीग स्पर्धेत मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.

या सामन्यात फलंदाजीला येण्यापूर्वी ती महिला प्रीमियर लीग स्पर्धेत 1000 धावा करण्याच्या उंबरठ्यावर होती. या डावात फलंदाजीला आल्यानंतर 4 धावा करतात तिने महिला प्रीमियर लीग स्पर्धेत 1000 धावा पूर्ण केल्या आहेत. यासह ती महिला प्रीमियर लीग स्पर्धेच्या इतिहासात 1000 धावा करणारी तिसरीच फलंदाज ठरली आहे. याआधी मुंबई इंडियन्सच्या फलंदाज नेट सिव्हर ब्रंट आणि हरमनप्रीत कौरने या स्पर्धेत 1000 धावांचा पल्ला गाठला आहे. सर्वात आधी 1000 धावा पूर्ण करण्याचा विक्रम हा नेट सिव्हर ब्रंटच्या नावावर होता. त्यानंतर मुंबई इंडियन्सची कर्णधार हरमनप्रीत कौरने गुजरात जायंट्स संघाविरूद्ध फलंदाजी करताना 1000 धावांचा पल्ला गाठला. तिने या सामन्यात 71 धावांची निर्णायक खेळी करून मुंबई इंडियन्सला विजय मिळवून दिला होता.

मेग लॅनिंग या हंगामात पहिल्यांदाच यूपी वॉरियर्स संघाकडून खेळण्यासाठी मैदानात उतरली आहे.याआधी झालेल्या तिन्ही हंगामात तिने दिल्ली कॅपिटल्स संघाचं नेतृत्व केलं होतं. यासह दिल्लीला फायनलमध्येही पोहोचवलं होतं. पण ती दिल्लीला विजय मिळवून देऊ शकली नव्हती. यावेळी तिच्याकडे यूपी वॉरियर्सच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पण सुरूवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये यूपीला पराभवाचा सामना करावा लागला आहे.

Comments are closed.