Ind vs NZ: नंबर 5 वर हिट आहे केएल राहुल, पुन्हा बनला टीम इंडियाचा संकटमोचक, ठोकले दमदार शतक!

भारतीय संघाला संकटातून बाहेर काढण्याची केएल राहुलला सवयच झाली आहे. जेव्हा जेव्हा भारतीय संघ दबावाखाली असतो, तेव्हा राहुल ‘संकटमोचक’ बनून संघाची नौका पार लावतो. असाच काहीसा नजारा पुन्हा एकदा पाहायला मिळाला आहे.

राजकोटच्या मैदानावर राहुलला त्याच्या आवडत्या क्रमांकावर म्हणजेच नंबर 5 वर फलंदाजी करण्याची संधी मिळाली. एका बाजूने सतत विकेट्स पडत असतानाही राहुलचे पाय डगमगले नाहीत. राहुलने केवळ भारतीय संघाचा डळमळीत झालेला डाव सावरला नाही, तर आपल्या वनडे कारकिर्दीतील 8 वे शतकही झळकावले.

दुसऱ्या वनडेत टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली होती. रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी पहिल्या विकेटसाठी 70 धावा जोडल्या. मात्र, दोन्ही सलामीवीर बाद होताच भारतीय संघाचा डाव वाईट रीतीने कोसळला. गिल 56 धावा करून बाद झाला, तर किंग कोहलीला क्रिस्टियन क्लार्कने 23 धावांवर क्लीन बोल्ड केले. श्रेयस अय्यरनेही आपल्या कामगिरीने निराशा केली आणि तो 8 धावा काढून बाद झाला.

118 धावांत 4 विकेट्स गमावून अडचणीत सापडलेल्या टीम इंडियाचा डाव सावरण्याची जबाबदारी केएल राहुलने उचलली. राहुलने पाचव्या विकेटसाठी रवींद्र जडेजासोबत 73 धावा जोडल्या. त्यानंतर राहुलने सहाव्या विकेटसाठी नितीश कुमार रेड्डीसोबत अर्धशतकी भागीदारी केली.

राहुल एक बाजू लावून धरून उभा राहिला आणि त्याने षटकारासह आपले शतक पूर्ण केले. 92 चेंडूंत 112 धावा करून राहुल नाबाद राहिला. आपल्या या खेळी दरम्यान त्याने 11 चौकार आणि एक षटकार लगावला. राहुलच्या उत्कृष्ट खेळीच्या जोरावर भारतीय संघ प्रथम फलंदाजी करताना धावफलकावर 284 धावा लावण्यात यशस्वी ठरला.

मात्र, राजकोटमध्ये चाहत्यांना रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या बॅटमधून मोठी खेळी पाहायला मिळाली नाही. रोहित आणि विराट दोघांनीही सुरुवात तर चांगली केली, पण मोठी खेळी करण्यात ते अपयशी ठरले. 38 चेंडूंचा सामना केल्यानंतर ‘हिटमॅन’ 24 धावा करून बाद झाला, तर किंग कोहलीच्या बॅटमधून 29 चेंडूंत 23 धावा निघाल्या.

Comments are closed.