Video: हर्षित राणाने विकेट घेताच कोच गंभीरची रिऍक्शन व्हायरल
भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसरा वनडे सामना राजकोट (14 जानेवारी) येथे खेळला जात आहे. या सामन्यात भारताच्या अंतिम अकरामध्ये हर्षित राणा याला निवडले गेले असून अनेक सामन्यांपासून तो संघाचा भाग राहिला आहे. तसेच त्याला चाहते मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरचा प्रिय खेळाडू म्हणूनही ओळखतात. यामुळे जेव्हा त्याने विकेट घेतली असता कॅमेरा लगेचच गंभीरकडे वळवला जातो. न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडेतही असेच झाले. राणाने डेवॉन कॉन्वेला बाद करताच गंभीरची रिऍक्शन तुफान व्हायरल झाली आहे.
या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकत भारताला प्रथम फलंदाजी करण्याचे आव्हान दिले. यजमानांनी केएल राहुलच्या शतकाच्या सहाय्याने किवीला 50 षटकात 285 धावांचे लक्ष्य दिले. न्यूझीलंडने ज्याप्रकारे फलंदाजीला सुरूवात केली त्यावरून भारताच्या अडचणी वाढणार की काय असे लक्षण दिसत होते. त्यानंतर आला सामना बदलणारा क्षण. सहाव्या षटकात राणा गोलंदाजीला आला. त्याने षटकाच्या दुसऱ्याच चेंडूत स्फोटक फलंदाज डेवॉन कॉन्वेला त्रिफळाचीत केले आणि कॅमेरा लगेचच गंभीरकडे वळाला. राणाने विकेट घेताच गंभीरने टाळ्या वाजवल्या. त्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.
सलामीवीर कॉन्वेची विकेट भारताची महत्वाचीच होती. त्याने 21 चेंडूत 3 चौकाराच्या मदतीने 16 धावा केल्या. राणाने त्याची आणि हेन्री निकल्सची भागीदारी तोडली. निकल्सला प्रसिद्ध कृष्णाने बाद केले.
भारताचीही फलंदाजी सुरूवात अडखळतच झाली होती. राहुलने रविंद्र जडेजा आणि नितीश कुमार रेड्डीच्या साथीने भारताचा डाव सांभाळला. न्यूझीलंडकडून सर्वाधिक विकेट क्रिस्टियन क्लार्कने घेतल्या. त्याने 8 षटकात 56 धावा देत रोहित शर्मा, विराट कोहली आणि श्रेयस अय्यरला बाद केले. न्यूझीलंडची फलंदाजी सुरू असून त्यांनी 24 षटकात 2 विकेट्स गमावत 112 धावा केल्या आहेत.
Comments are closed.