मुदतीनंतरही प्रचाराची प्रथा आली कुठून? पाडू मशीनमुळे मतदानात गडबड होणार नाही याची खात्री कोण देणार? ठाकरे बंधूंचा निवडणूक आयोगाला संतप्त सवाल
प्रचाराची मुदत संपल्यानंतरही उमेदवारांनी मतदारांना भेटण्याची मुभा याच निवडणुकीत का, यापूर्वीच्या का नव्हती आणि नव्या ‘पाडू’ मशीनमुळे मतदानात गडबड होणार नाही याची खात्री कोण देणार, असा खणखणीत सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज निवडणूक आयोगाला केला.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यासह संपूर्ण ठाकरे कुटुंबीयांनी आज मतदानाच्या आदल्या दिवशी मुंबईची ग्रामदेवता मुंबादेवी मातेचे दर्शन घेतले. त्यानंतर राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी ठाकरे बंधूंनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. याप्रसंगी शिवसेना नेते-खासदार संजय राऊत हेसुद्धा उपस्थित होते.
यावेळी राज ठाकरे म्हणाले की, महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार मंगळवारी पाच वाजता थांबला. प्रचार थांबल्यानंतर दुसरा दिवस रिकामा आणि त्याच्या दुसऱया दिवशी मतदान अशी आतापर्यंतच्या निवडणुकीची प्रथा होती. मात्र यावेळी निवडणूक आयोगाने पत्रक काढून मतदानाच्या आदल्या दिवशी पाच वाजेपर्यंत उमेदवारांना मतदारांना भेटण्याची मुभा दिली. ही नवीन प्रथा कुठून आली? ही प्रथा लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला का नव्हती? मुभा मिळाली की दिली, की कायदा बदलला? अशा शब्दांत राज ठाकरे यांनी आयोगाला जाब विचारला.
राजकीय पक्षाला न दाखवता पाडू मशीन वापरताहेत
निवडणूक आयोगाने आणलेल्या नव्या प्रिंटिंग ऑक्सिलरी डिस्प्ले युनिट (पाडू) या मशीनवरूनही राज ठाकरे यांनी आयोगाला धारेवर धरले. ही मशीन कशी आहे, कशासाठी वापरतात याबद्दल आयोगाने कुठल्याही राजकीय पक्षाला कल्पना दिलेली नाही, असे ते म्हणाले. शिवसेनेने यासंदर्भात आयोगाला पत्र दिले, पण आयोगाकडून मनमानी कारभार सुरू आहे. निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे याबाबत उत्तर द्यायला तयार नाहीत. आत्ताच्या सरकारने हा वाघ कधीच मारून टाकला आहे म्हणून त्यांच्याकडून काही अपेक्षा नाही, अशी चपराकही राज ठाकरे यांनी लगावली. नवीन मशीन आलेय हे आधी का दाखवण्यात आले नाही? या मशीनमधून मतदानाची गडबड होणार नाही याची खात्री कोण देणार? इतकी बेबंदशाही सुरू आहे, अशी टीकाही राज ठाकरे यांनी केली.
हरलेली बाजी जिंकण्यासाठी आयोग सरकारला मदत करतोय
भाजप व शिंदेंच्या लोकांनी पत्रकामध्ये पाच-पाच हजार रुपये वाटल्याचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत, पण लोकांनी ते नाकारल्याचेही दिसले ही आनंदाची बाब आहे, असे राज ठाकरे म्हणाले. हरलेली गोष्ट जिंकण्यासाठी निवडणूक आयोग सरकारची मदत करतोय का? असा निवडणूक आयोगावर आमचा आरोप आहे, असेही ते पुढे म्हणाले. निवडणुकीच्या तोंडावर रोजच्या रोज सरकार आणि निवडणूक आयोग कायदे बदलत आहेत. पत्रकार आणि राज्यातील जनतेने त्याबाबत आयोगाला जाब विचारला पाहिजे, असे राज ठाकरे म्हणाले.
शिवसैनिक, मनसैनिकांनो… सतर्क रहा
शिवसेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी सतर्क रहावे, आपल्या विभागात आणि मतदान बुथवर काय सुरू आहे यावर बारीक लक्ष ठेवावे, सत्ताधारी पक्षाचे उमेदवारही कुठे पैसे वाटत आहेत त्यावर लक्ष ठेवा, असे आवाहन यावेळी राज ठाकरे यांनी केले.
“सरकारला जी गोष्ट हवी आहे ती गोष्ट करून देण्यासाठी निवडणूक आयोग आहे का? सरकारला ज्या सुविधा हव्या आहेत त्यासाठी निवडणूक आयोग काम करतो आहे का? सरकारला जे हवेय तेच निवडणूक आयोग करतोय. उमेदवार मतदारांना भेटू शकतात, पण पत्रके वाटू शकत नाही, मग पैसे वाटण्यासाठी ही वेळ दिली आहे का?”
Comments are closed.