पडद्याआडून – कोकणचा बाज, संगमेश्वरी साज कोकणाचा श्वास रंगमंचावर
पराग खोत
मुख्य प्रवाहातील व्यावसायिक नाटकांच्या झगमगाटात आजही काही रंगकर्मी असे आहेत, जे मातीशी नाळ जोडून ठेवणारे प्रयोग प्रामाणिकपणे सादर करत आहेत. ‘कोकणचा बाज–संगमेश्वरी साज’ हे लोकनाट्य पाहताना अशाच अस्सल, रांगड्या आणि तरीही भावनिक अनुभवाची जाणीव होते. केवळ करमणूक न करता प्रेक्षकाला आपल्या संस्कृतीकडे, भाषेकडे आणि माणसांच्या जगण्याकडे पुन्हा एकदा वळवण्याचे सामर्थ्य या प्रयोगात आहे.
ही कोकणच्या मातीतील एक अस्सल गोष्ट आहे—तिथल्या तितक्याच अस्सल माणसांची. त्यांच्यातील परस्परसंबंध, नाती, हसणं-रडणं, सणावारांची उधळण आणि दैनंदिन संघर्ष यांची सुंदर गुंफण या नाट्यात दिसते. ‘गावाकडचे गजाल्यो आणि कोकणी धुमशान’ यांचे खरंखुरे चित्रण इथे अनुभवायला मिळते. गावकीच्या गणपतीतील आरत्यांपासून सुरू झालेली ही सफर, वेगवेगळ्या वाटा आणि वळणे घेत शेवटी कोकणातील लोककला आणि त्यांच्या जपणुकीवर येऊन विसावते. नमन, गण, गवळण, जाखडी, रोंबाट असे विविध प्रकार इथे पाहायला मिळतात. त्यांना ऑर्गन, ढोलकी आणि पखवाजाची जिवंत साथ लाभते.
अजिबात नेपथ्य नसलेले, मुक्तनाट्याचा बाज असलेले हे नाटक शब्दनिष्ठ आणि प्रसंगनिष्ठ विनोदाचा उत्तम नमुना आहे. रोजच्या जगण्यातला कोरडा रांगडेपणा लाह्या तडतडाव्यात तसा संवादातून बाहेर येतो. मात्र त्या विनोदाला कारुण्याची धार आहे आणि म्हणून तो अधिक भावतो. कोकणातील गरीबी, तिथल्या लोकांच्या जगण्यातला संघर्ष आणि तरीही आलेला दिवस आनंदाने ढकलत जगत जाण्याची उर्मी यावर हे नाटक भाष्य करते. सोबत आनंदाचा शिधा, घरकुल आणि लाडकी बहीण यांसारख्या विविध सरकारी योजनांमुळे त्यांच्या आयुष्यात नेमका कोणता बदल झाला आहे, हे विनोदी अंगाने मांडले जाते. लोकगीतं, नृत्य, विनोद आणि भावनिक क्षण यांचा असा काही मेळ साधला आहे की प्रेक्षक नकळत त्याचा भाग होतो. कलाकारांचा अभिनय बेधडक, प्रामाणिक आणि अंगात भिनणारा आहे. कुठेही आडपडदा जाणवत नाही; सगळं काही खरंखुरं वाटतं. मुख्य म्हणजे नाटक नीट बसवलेलं आहे. खूप छोटे-छोटे तपशील असूनही कुठेही अगदी छोटीशीसुद्धा चूक होत नाही किंवा संवादात फंबल पडत नाही—हे दिग्दर्शक आणि कलाकारांचे वैशिष्ट्य आहे.
सगळे कलाकार अनोळखी असले तरी शिवरामच्या भूमिकेतील सचिन काळे या अभिनेत्याचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. भूमिकेची त्याची समज आणि व्यक्तिरेखेची पकडलेली अचूक नस नाटकाला उंची देते. ‘चला हवा येऊ द्या’ आणि इतर काही मालिकांत चमकून गेलेल्या या कलावंताला निश्चितच मोठ्या संधी मिळायला हव्यात. रंगभूमीवरील मान्यवरांनी इथे लक्ष द्यावे, अशी अपेक्षा आहे. तात्या नामक सूत्रधार नाटकाला योग्य दिशेने घेऊन जातो. इतरही कलाकारांची कामे हौशी नाटकाच्या मानाने उजवी आहेत. संपूर्ण लोकनाट्य खेड ते राजापूर पट्ट्यात बोलल्या जाणाऱ्या संगमेश्वरी बोलीभाषेत आहे, जिचा वापर वैभव मांगले, प्रभाकर मोरे आणि ओंकार भोजने यांनी प्रभावीपणे केला आहे.
आजच्या धावपळीच्या आणि ग्लॅमरकेंद्री काळात अशी लोकनाट्ये टिकून राहणे हीच मोठी जमेची बाजू आहे. कारण ही नाट्यकृती केवळ करमणूक करत नाही, तर बोलीभाषा, लोककला आणि सांस्कृतिक अस्मिता जपण्याचे महत्त्वाचे काम करते. पुढच्या पिढीला कोकण समजून घ्यायचा असेल तर असे प्रयोगच त्यांना मार्ग दाखवतात. गंगाराम गवाणकर आणि संतोष पवार यांनी कोकणातील अशाच प्रयोगशील प्रयत्नांना व्यावसायिक रंगमंचावर मोठे केले—इतके जरी सांगितले तरी या नाटकाचा बाज लक्षात यावा.
मुख्य प्रवाहातील नाटकांच्या सोबतीने ‘कोकणचा बाज–संगमेश्वरी साज’ सारख्या प्रयोगांना व्यासपीठ मिळणे अत्यावश्यक आहे. असे वेगळे, धाडसी आणि मातीशी नातं सांगणारे प्रयत्न करणाऱ्या रंगकर्मींना मनापासून दाद द्यायलाच हवी. कारण रंगमंच जिवंत राहतो, तो अशाच अस्सल प्रयोगांमुळे.
मूळ संकल्पना: गिरीश बोंद्रे, आनंद बोंद्रे
लेखक-दिग्दर्शक: सुनील बेंडखळे
कलाकार: आशीष सावंत, सिद्धेश सावंत–देसाई, रवींद्र गोनबरे, हनुमान गोनबरे, अनिकेत गोनबरे, अमर गोनबरे, आदेश मालप, अंकुश तांदळे, स्वप्नील सुर्वे, विश्वास सनगरे, अथर्व सुर्वे, राजेंद्र भोगले, केतन शिंदे, सचिन काळे, राजेश ऊर्फ पिंट्या चव्हाण आणि सुनील बेंडखळे
बॅकस्टेज: आप्पा शिर्के
प्रकाश: अनिकेत गानू
सिंथेसायझर: मंगेश मोरे
ढोलकी-पखवाज: मंगेश चव्हाण, अभिषेक भालेकर
निर्माते: समर्थ कृपा प्रॉडक्शन, रत्नागिरी
समन्वयक: चंद्रकांत मुरमुर
Comments are closed.