आता सबरीमालामध्ये तूप घोटाळा.
केरळ उच्च न्यायालयाकडून चौकशीचा आदेश : यापूर्वी मंदिरात सोने चोरी
वृत्तसंस्था/ तिरुअनंतपुरम
शबरीमला मंदिरात सोने चोरी प्रकरणानंतर आता तूप घोटाळा समोर आला आहे. केरळ उच्च न्यायालयाने आता नैय्याभिषेकमनंतर शिल्लक ‘आदिया सिष्टम तूपा’च्या विक्रीतील 35 लाख रुपयांच्या कथित अनियमिततेच्या चौकशीसाठी दक्षता पथक स्थापन करण्याचा आदेश दिला आहे. शबरीमला विशेष आयुक्तांनी अहवाल सोपवून तूपाच्या विक्रीशी निगडित रकमेच्या विस्तृत दक्षता चौकशीची मागणी केल्यावर उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचे न्यायाधीश व्ही. राजा विजयाराघवन आणि के.व्ही. जयकुमार यांनी हा आदेश दिला आहे.
17 नोव्हेंबर ते 26 डिसेंबर 2025 आणि 27 डिसेंबर 2025 ते 2 जानेवारी 2026 पर्यंत कथित अनियमितता जवळपास 35 लाख रुपयांची अनुमानित असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयाने दक्षता आयुक्ताला सक्षम अधिकाऱ्यांची टीम स्थापन करणे आणि टीडीबीच्या मुख्य दक्षता आणि सुरक्षा अधिकाऱ्याच्या अहवालाच्या आधारावर गुन्हा नोंद करण्याचा निर्देश दिला आहे. दक्षता पथकाला एक महिन्याच्या आत प्रगती अहवाल सोपविण्याचा निर्देश देण्यात आला आहे.
खात्यात जमा झाली नाही रक्कम
मारमठ बिल्डिंग काउंटरवरून 16,628 पॅकेट्सच्या विक्रीची रक्कम टीडीबीच्या खात्यात जमा झाली नसल्याचे चौकशीदरम्यान आढळून आले. प्रत्येक पाकिटात 100 मिलिलिटर तूप होते आणि ते भाविकांना 100 रुपयांमध्ये विकण्यात आले होते. 3,52,050 पाकिटे तयार करण्यात आली होती ज्यातील जवळपास 89,300 पाकिटे काउंटरवरून विकण्यात आली. परंतु कर्मचाऱ्यांनी कवळ 75,450 पाकिटांचे पैसे जमा केल्याचे स्पष्ट झाले आहे.
सुनीलकुमार पोट्टी यांना निलंबित केले
देवोस्वोम कर्मचारी सुनील कुमार पोत्तीने तूपाच्या विक्रीच्या पावत्या भाविकांना दिल्या नव्हत्या. तसेच त्याने विक्रीतून प्राप्त झालेली रक्कमही जमा केली नव्हती. हा प्रकार समोर आल्यावर सुनील कुमार पोत्तीला निलंबित करण्यात आले असून पुढील कारवाई प्रस्तावित करण्यात आल्याचे टीडीबीने सांगितले आहे.
Comments are closed.