‘तरी आम्ही सामना हरलो असतो…’ शुभमन गिल संतापला, स्पष्ट शब्दांनी संघाची पोलखोल, नेमकं काय म्हण
दुसऱ्या वनडेत न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतर शुभमन गिलचे विधान : भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना 14 जानेवारी रोजी राजकोटमध्ये खेळवण्यात आला. या सामन्यात भारतीय संघाला 15 चेंडू शिल्लक असतानाच सात गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. या पराभवानंतर भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिल चांगलाच नाराज झालेला दिसून आला.
शुभमन गिल काय म्हणाला?
सामन्यानंतर बोलताना गिल म्हणाला, “मधल्या षटकांमध्ये आम्ही विकेट्स घेऊ शकलो नाही. सर्कलमध्ये पाच क्षेत्ररक्षक असताना विकेट मिळत नसेल, तर काम अधिक कठीण होतं. आम्ही जर 15-20 धावा अधिक केल्या असत्या, तरीही सामना जिंकणं अवघडच होतं.”
284 धावांच्या भारताच्या स्कोअरबाबत बोलताना गिलने स्पष्ट केलं की, “एकदा मोठी भागीदारी जमली की सेट झालेल्या फलंदाजाची जबाबदारी असते की तो पुढे जाऊन मोठी खेळी करेल. आमच्या गोलंदाजांनी चांगली सुरुवात करून दिली होती, मात्र न्यूझीलंडच्या फलंदाजांनी मधल्या षटकांमध्ये उत्कृष्ट फलंदाजी केली.”
तो पुढे म्हणाला, “सुरुवातीच्या 10-15 षटकांमध्ये गोलंदाजी करताना चांगली साथ मिळत होती, पण त्यानंतर खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल झाली. आम्ही थोडा अधिक आक्रमक खेळ करू शकलो असतो आणि जोखीम घ्यायला हवी होती.”
या सामन्यात भारतीय संघाची क्षेत्ररक्षणही कमकुवत ठरली. अनेक महत्त्वाच्या क्षणी खेळाडूंनी सोपे झेल सोडले, ज्याचा थेट फटका संघाला बसला. फील्डिंगवर बोलताना शुभमन गिल म्हणाला, “मागील सामन्यातही आम्ही संधी गमावल्या होत्या. आम्ही क्षेत्ररक्षण सुधारण्याचा प्रयत्न करत आहोत, पण संधींचा फायदा घेतला नाही, तर अडचणी येणारच.”
सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, केएल राहुलच्या शतकाच्या बळावर भारताने 50 षटकांत 7 विकेट्सच्या मोबदल्यात 284 धावा केल्या. 286 धावांचे लक्ष्य गाठताना न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली आणि त्यांनी लवकरच दोन विकेट्स गमावल्या. मात्र त्यानंतर डॅरिल मिचेल आणि विल यंग यांनी तिसऱ्या विकेटसाठी 162 धावांची भागीदारी करत सामन्याचा मार्ग पूर्णपणे किवींच्या बाजूने वळवला. विल यंग शतकाच्या उंबरठ्यावर आऊट झाला, त्याने 98 चेंडूत 7 चौकारांच्या मदतीने 87 धावा केल्या. यानंतर मिचेलने ग्लेन फिलिप्ससोबत संयमी आणि आक्रमक खेळाचे उत्तम मिश्रण दाखवत डाव पुढे नेला आणि सामना जिंकून दिला. मिचेलने 117 चेंडूत 11 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने नाबाद 131 धावांची मॅच-विनिंग खेळी साकारली. ग्लेन फिलिप्सने 25 चेंडूत 2 चौकार आणि 1 षटकार लगावत नाबाद 32 धावा करत विजयावर शिक्कामोर्तब केले. भारताकडून हर्षित राणा, प्रसिद्ध कृष्णा आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. या विजयासह तीन सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडने बरोबरी साधली असून सध्या मालिका 1-1 अशी समसमान स्थितीत आहे.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.