युवा वर्ल्ड कपचा झंझावात आजपासून सूर्यवंशीच्या बॅटवर जगाचे लक्ष; हिंदुस्थान वर्चस्व कायम राखण्यासाठी सज्ज

हिंदुस्थानचा युवा क्रिकेटचा रणसंग्राम आजपासून सुरू होत आहे. आयसीसी एकदिवसीय युवा वर्ल्ड कपमध्ये (१९ वर्षांखालील) आपले वर्चस्व कायम राखण्याच्या निर्धाराने हिंदुस्थान मैदानात उतरत आहे. १५ जानेवारी ते ६ फेब्रुवारीदरम्यान झिम्बाब्वे आणि नामिबिया येथे रंगणाऱ्या या महायुद्धात हिंदुस्थानची नजर सहाव्या विश्वचषकावर आहे.

५० षटकांचा हा १९ वर्षांखालील युवकांचा वर्ल्ड कपचा १६ वा हंगाम असून, जगातील १६ बलाढ्य संघ या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. साखळी फेरी, सुपर सिक्स, उपांत्य फेरी आणि अंतिम सामना असा थरारक प्रवास या स्पर्धेत पाहायला मिळणार आहे. ६ फेब्रुवारीला हरारे येथे अंतिम सामना खेळवला जाणार आहे.

म्हात्रेच्या नेतृत्वाखाली युवा पलटण

हिंदुस्थानच्या १५ सदस्यीय संघाची धुरा आयुष म्हात्रेच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे, तर विहान मल्होत्रा उपकर्णधाराची जबाबदारी सांभाळणार आहे. संघात अनुभव आणि युवा जोश यांचा सुरेख समतोल साधण्यात आला आहे.

वैभव सूर्यवंशी सर्वात ‘हॉट’

या विश्वचषकात अवघ्या १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीकडे संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले आहे. आक्रमक फलंदाजी, निर्भीड खेळ आणि मोठ्या सामन्यांत चमकण्याची क्षमता यामुळे वैभव हा केवळ हिंदुस्थानचाच नव्हे, तर जागतिक क्रिकेटमधील चर्चेचा विषय ठरत आहे. निवड समितीपासून ते आंतरराष्ट्रीय क्रिकेटतज्ज्ञांपर्यंत सर्वांच्या नजरा या युवा खेळाडूवर खिळल्या आहेत.

इतिहास हिंदुस्थानच्या बाजूने

हिंदुस्थानने आतापर्यंत पाच वेळा विश्वविजेतेपद पटकावले आहे (२०००, २००८, २०१२, २०१८, २०२२), तर चार वेळा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे (२००६, २०१६, २०२०, २०२४). सध्याचा विजेता ऑस्ट्रेलिया असला, तरी हिंदुस्थानचा युवा संघ पुन्हा एकदा इतिहास घडवण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे.

हिंदुस्थान अंडर-१९ क्रिकेट संघ :
आयुष म्हात्रे (कर्णधार), विहान मल्होत्रा (उपकर्णधार), वैभव सूर्यवंशी, आरोन जॉर्ज, वेदांत त्रिवेदी, अभिज्ञान पुंडू (यष्टिरक्षक), हरवंश सिंग (यष्टिरक्षक), आर. एस. अंबरीश, कनिष्क चौहान, खिलन ए. पटेल, मोहम्मद एनां, हेनिल पटेल, डी. दीपेश, किशन कुमार सिंग, उद्धव मोहन.

थेट प्रक्षेपण कुठे पाहाल…
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स नेटवर्क
थेट स्ट्रीमिंग : जिओ हॉटस्टार

Comments are closed.