BMC Election 2026 – महिलेच्या आडनावात घोळ; ‘मांडवकर’ महिलेचे केले ‘जॉन’

निवडणूक आयोगाच्या गलथान कारभाराची नवनवीन उदाहरणे समोर आली आहेत. वर्सोवा विधानसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येणाऱ्या अनेक मतदान केंद्रांवर निवडणूक आयोगाने जारी केलेल्या मतदार याद्यांमध्ये नावे चुकवली गेली. मराठी महिलेचे आडनाव ‘मांडवकर’ आहे. मात्र तिच्या आडनावाच्या जागी ‘जॉन’ करण्यात आले. निवडणूक आयोगाची चूक असतानाही त्या मराठी महिलेला मतदानाचा हक्क बजावण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र महिलेचा सजग मुलगा, शिवसैनिक संतोष मांडवकर यांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यामुळे महिलेला मतदानाचा हक्क बजावता आला.
पालिका निवडणुकीसाठी मराठी लोक मोठ्या उत्साहाने मतदान करण्यास घराबाहेर पडले होते. त्यातील बहुतांश मतदारांना निवडणूक कार्यालयाचा सावळागोंधळ प्रत्ययास आला. वर्सोवा- यारी रोड येथील ज्येष्ठ नागरिक महिलेला निवडणूक आयोगाच्या कारभाराचा ताप सहन करावा लागला. वर्सोवा वेल्फेअर असोसिएशन हायस्कूल येथील मतदान केंद्रामध्ये नाव असलेल्या ‘मधुरा शंकर मांडवकर’ या महिलेच्या नावात ‘शंकर मधुरा जॉन’ अशी चूक करण्यात आली. पतीचे नाव आधी आणि आडनाव भलतेच, असा घोळ निवडणूक आयोगाने घातला. आयोगाच्या चुकीवरुन महिलेला मतदान करण्यापासून रोखण्यात आले. त्यावर महिलेचा मुलगा, शिवसैनिक संतोष मांडवकर यांनी मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांना विचारणा केली. त्यानंतर मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांनी आधार कार्डची पडताळणी करुन मतदान करण्यास दिले. निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीतील घोळाचा निष्कारण त्रास सहन करावा लागल्याची प्रतिक्रिया संतोष मांडवकर यांनी दिली.

Comments are closed.