न्यूझीलंड इतका सहज कसा जिंकला? दिग्गजांचे भारताच्या प्लेईंन इलेवनवरच प्रश्नचिन्ह!
भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसरा वनडे सामना चाहत्यांच्या चांगलाच लक्षात राहिल. त्यामागचे कारणही तसेच आहे. राजकोट येथे 14 जानेवारीला झालेला हा सामना यजमानांनी गमावला आणि न्यूझीलंडने तीन सामन्यांची वनडे मालिका 1-1 अशी बरोबरीत केली. या सामन्यात भारताच्या पराभवासाठी अनेकांना कारणीभूत ठरवले जात आहे. चोहोबाजूंनी संघावर टीका होत असताना भारतीय दिग्गजानेही त्यात उडी घेतली आहे.
सुनिल गावस्कर यांनी केवळ गोलंदाजी, फलंदाजी नाही तर अंतिम अकरावरही प्रश्न निर्माण केले आहे. जियो हॉटस्टारवर बोलताना गावस्करांनी न्यूझीलंडच्या फलंदाजीचे कौतुक करत भारत सामना हरला यावर विश्वासच बसत नाही असे वक्तव्य केले आहे.
“न्यूझीलंडने इतक्या सहजतेने फलंदाजी केली याचे आश्चर्य आहे. कारण भारतीय गोलंदाज स्लो खेळपट्टीचा फायदा घेतील अशी अपेक्षा होती. हा सामना भारत जिंकेल असेही वाटत होते, मात्र न्यूझीलंडने संयमी खेळ केला आणि सामना जिंकला”, असेही गावसकर पुढे म्हणाले.
आता पुढील सामन्यात संघ निवडताना भारताला अधिक विचार करावा लागणार याबाबत बोलताना गावसकर म्हणाले, “तिसऱ्या आणि मालिका निर्णायक सामन्यात भारत आता अंतिम अकरामध्ये बदल करू शकत नाही. जर दुसरा सामना जिंकला तर भारताने बाकावर बसवलेल्या खेळाडूंना तिसऱ्या सामन्यात संधी दिली असती, आता ते शक्य नाही. आता कोणतीही जोखीम न घेता भारताला तिसऱ्या सामन्यात संघ निवडताना अधिक बदल करणे योग्य नाही.”
तसेच गावसकरांनी डॅरिल मिचेल आणि विल यंग यांच्या फलंदाजीचे कौतुक केले. त्या दोघांनी कुलदीप यादव आणि रविंद्र जडेजा यांचा अप्रतिम सामना केला आणि न्यूझीलंडच्या विजयात मोलाची भुमिका पार पाडली. हा सामना न्यूझीलंडने 7 विकेट्सने जिंकला. या मालिकेतील तिसरा सामना 18 जानेवारीला इंदौर येथे खेळला जाणार आहे.
Comments are closed.