WPL 2026: अखेर यूपी वॉरियर्सने विजयाची चव चाखली; मुंबईला 7 विकेट्सने लोळवलं
वुमेन्स प्रीमियर लीग (WPL) 2026 मधील आठव्या सामन्यात यूपी वॉरियर्सने शानदार कामगिरी करत मुंबई इंडियन्सचा 7 विकेट्सने पराभव केला. नवी मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील स्पोर्ट्स अकॅडमी येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात यूपी वॉरियर्सने लक्ष्याचा पाठलाग करताना शानदार खेळ सादर केला आणि 18.1 षटकांमध्ये विजय मिळवला.
सामन्यात यूपी वॉरियर्सची कर्णधार मेग लॅनिंगने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने 20 षटकात 5 विकेट्स गमावून 161 धावा केल्या. मुंबईची सुरुवात मात्र संथ झाली. सलामीवीर गुणालन कमलिनी अवघ्या 5 धावांवर सोफी एक्लेस्टोनच्या गोलंदाजीवर बाद झाली. त्यानंतर नॅट सायव्हर-ब्रंटने जबाबदारी स्वीकारत आक्रमक फलंदाजी केली.
सायव्हर-ब्रंटने 43 चेंडूत 9 चौकार आणि 1 षटकारासह 65 धावांची खेळी केली. तिला मधल्या फळीत अमनजोत कौरने 38 धावांची साथ दिली, तर शेवटी निकोला केरीने नाबाद 32 धावा करत डावाला वेग दिला. सायव्हर-ब्रंट आणि केरी यांच्यात चौथ्या विकेटसाठी 85 धावांची महत्त्वाची भागीदारी झाली. यूपी वॉरियर्सकडून शिखा पांडे, दीप्ती शर्मा, सोफी एक्लेस्टोन आणि आशा शोभना यांनी प्रत्येकी एक विकेट घेत अचूक गोलंदाजी केली.
162 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना यूपी वॉरियर्सची सुरुवात शानदार झाली. कर्णधार मेग लॅनिंग (25) आणि किरण नवगिरे (10) लवकर बाद झाल्या, मात्र त्यानंतर हरलीन देओलने सामना पूर्णपणे आपल्या बाजूने वळवला. हरलीनने 39 चेंडूत 12 चौकांसह नाबाद 64 धावांची अप्रतिम खेळी साकारली. तिला फोबे लिचफिल्ड (25) आणि क्लो ट्रायोन (11 चेंडूत 27 धावा) यांची चांगली साथ लाभली.
यूपी वॉरियर्सने 3 विकेट्स गमावत 18.1 षटकामध्ये लक्ष्य पूर्ण केले. मुंबईकडून नॅट सायव्हर-ब्रंटने 2 विकेट्स घेतल्या, तर अमेलिया केरला 1 विकेट मिळाली. या विजयासह यूपी वॉरियर्सने स्पर्धेत आपली भक्कम दावेदारी सादर करत गुणतालिकेत महत्त्वाची झेप घेतली आहे.
Comments are closed.