गोंधळ, बाचाबाची, संताप… मतदारांची दमछाक; मार्कर पुरविणाऱ्या कोरस कंपनीच्या चौकशीचे आदेश

मुंबईसह राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीत आज अभूतपूर्व गडबडगोंधळ आणि गंडवागंडवी पाहायला मिळाली. बोटाला शाई लावण्याची जुनी पद्धत बंद करून थेट बोटावर खूण करण्यासाठी मार्करचा वापर करण्यात आला. ही खूण सहज पुसता येत होती. त्यामुळे प्रचंड गदारोळ झाला. ही सरळसरळ लोक‘शाई’ फेक आहे. लोकशाहीची विटंबना आहे. फेक लोकशाही आहे, असा संताप जनमानसातून आणि समाजमाध्यमांतून व्यक्त झाला. विरोधी पक्षाच्या नेत्यांनीही यावर तीव्र आक्षेप घेतला. गोंधळ शाईपुरताच नव्हता तर कुठे ईव्हीएम बंद, कुठे उमेदवाराच्या नावापुढचे बटण ऑफ, कुठे यादीतून मतदारांचे नावच गायब, कुठे थेट मतदान केंद्रात पोलिंग एजंटच्या खिशावर भाजप उमेदवारांच्या नावाचा स्टिकर, कुठे मतदान केंद्रांची शोधाशोध तर कुठे बोगस मतदान… बिहारलाही मागे टाकेल असे चित्र सर्वत्र दिसले.

मुंबईसह महाराष्ट्रात पालिकांसाठी मतदान झाले. तब्बल नऊ वर्षांनंतर पालिकेसाठी मतदारांनी आपला कौल दिला. सकाळपासूनच मतदारांमध्ये उत्साह दिसत होता. मात्र निवडणूक यंत्रणेच्या गोंधळी कारभाराचा मनस्ताप सर्वांनाच सहन करावा लागला. यादीतील घोळामुळे अनेकांची मतदान केंद्रांची शोधाशोध करताना दमछाक झाली. सगळ्याच शहरांमध्ये हे चित्र होते. त्यात मार्करने बोटावर केलेली खूण सहज पुसली जात असल्याचे व्हिडीओच अनेकांनी समाजमाध्यमांवर पोस्ट केले. त्यामुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली. त्यावर उत्तर देताना आयोगाची भंबेरी उडाली. शाईऐवजी मार्कर का वापरला यावर आयोगाने सारवासारव केली.

एकाच घरातील मतदारांची नावे वेगळ्या वॉर्डात

एकाच घरात, एकाच पत्त्यावर राहणाऱ्या मतदारांची नावे वेगवेगळ्या वॉर्डांच्या मतदार यादीत टाकण्यात आली होती. साकीनाका आणि असल्फा विभागात हा प्रकार आढळून आला. प्रशांत मुंढे यांचे नाव वॉर्ड क्र. 158 च्या मतदार यादीत होते, तर त्यांच्या पत्नी अश्विनी यांचे नाव वॉर्ड क्रमांक 159 मध्ये होते.

जोगेश्वरीत भाजपकडून बुथ कॅप्चरिंग!

जोगेश्वरीतील प्रभाग क्रमांक 74 मध्ये भाजप उमेदवाराकडून बुथ कॅपचर करण्यात आल्याचा आरोप मनसेने केला. ओबेरॉय स्लेंडर या इमारतीत पोलिंग बुथवर भाजप उमेदवार मतदान सुरू असताना आत होत्या. आयोगाशी संगनमताने निवासी इमारतीत मतदान केंद्र उभारल्याचा आरोप मनसे पदाधिकारी नितीन गावडे यांनी केला.

अहिल्यानगरमध्ये बोगस ओळखपत्रांचा साठा

अहिल्यानगरमध्ये आनंद विद्यालय मतदान केंद्र परिसरात बनावट ओळखपत्रांचा साठा आढळला. काही व्यक्तींकडे बनावट आधारकार्ड तसेच बनावट मतदान ओळखपत्रे असल्याच्या तक्रारी मतदान कर्मचाऱयांना प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची खातरजमा करून संबंधितांना तोफखाना पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले.

जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये मार्कर नाही

मुंबई महानगरपालिकेतील मतदानानंतर मतदाराच्या तर्जनीवर लावण्यात आलेली मार्करची शाई पुसली जात असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर मार्कर पुरवणाऱ्या कोरस कंपनीच्या शाईच्या दर्जाची चौकशी करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्याचवेळी 5 फेब्रुवारीला होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत मार्कर न वापरण्याचा निर्णय आयोगाने घेतला. मैसूर इंक कंपनीची पारंपरिक शाई वापरण्यात येणार आहे, असे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सांगितले.

मार्करची शाई पुसली जात असल्याचे विरोधी पक्षाच्या नेत्यांनी समोर आणल्यानंतर निवडणूक आयोगाने अखेर त्याची दखल घेतली आहे. मार्कर व त्यातील शाईचा दर्जा तपासण्यात येणार आहे. शाईच्या संदर्भात निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या निकषानुसार कोरस पंपनीने शाई पुरवली होती का त्याचीही तपासणी करण्यात येणार आहे, असे वाघमारे यांनी नमूद केले.

नेल पेंट रिमूव्हर लाजाळू अदृश्य

मतदान झाल्यानंतर बोटावर लावण्यात येणारी शाई नेलपेंट रिमुव्हरने पुसल्यास गायब होत असल्याचे काँग्रेसचे प्रवत्ते सचिन सावंत यांनी सांगितले. याबाबत त्यांनी एक व्हिडीओच सोशल मीडियावर प्रात्यक्षिकासह प्रसिद्ध केला आहे. निवडणूक आयोग याबद्दल कोणती कारवाई करणार, असा सवाल त्यांनी केला.

दादरमध्ये दुबार मतदार

मुंबई पालिका निवडणुकी दरम्यान दादरमधील वॉर्ड क्र. 192मध्ये दुबार मतदार आढळल्याची घटना घडली आहे. या वेळी या ठिकाणी शिवसेना, मनसे, राष्ट्रवादीचे उमेदवार यशवंत किल्लेदार यांनी आक्षेप घेतल्यानंतर संबंधित महिलेकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेतल्यानंतर तिला मतदान करण्यास देण्यात आले.

भायखळ्यात टॅक्सीत ईव्हीएम

भायखळ्यामध्ये मतदान संपल्यानंतर मतदान केंद्रातून ईव्हीएम थेट खासगी टॅक्सीत जमा केल्याचा प्रकार शिवसेना आणि मनसेने उघड केला. या वेळी फक्त एक सुरक्षारक्षक असलेली ही टॅक्सी संपूर्ण काही ठिकाणची ईव्हीएम जमा करीत असल्याचे समोर आले. या वेळी शिवसेना, मनसे, राष्ट्रवादीच्या उमेदवार शलाका हरयाण यांनी संबंधित निवडणूक अधिकाऱयांना जाब विचारला. या वेळी अधिकाऱ्यांनी अखेर पंचनामा लिहून दिला.

Comments are closed.