आता झारखंडमध्येही ईडीशी वाद सुरू आहे.

ईडी अधिकाऱ्यांवर मारहाणीचा आरोप : चौकशीसाठी पोलीस पोहोचले तपास यंत्रणेच्या कार्यालयात

वृत्तसंस्था/रांची

झारखंड पोलीस रांची येथील ईडी कार्यालयात चौकशीसाठी पोहोचले आहेत. ही कारवाई संतोष कुमार नामक एका व्यक्तीने ईडी अधिकाऱ्यांविरुद्ध मारहाणीचा आरोप करणाऱ्या एफआयआरनंतर केली आहे. याप्रकरणी दाखल झालेल्या तक्रारीवरून पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. पश्चिम बंगालमधील ‘आय-पॅक’ वादानंतर झारखंड पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे केंद्रीय संस्था आणि राज्य सरकारमधील तणाव आणखी वाढला आहे. पोलीस आता सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांद्वारे हल्ल्याच्या दाव्यांची सत्यता तपासत आहेत.

ईडीच्या दोन अधिकाऱ्यांनी चौकशीदरम्यान आपल्यावर हल्ला केल्याचा आरोप एका व्यक्तीने केला आहे. 12 जानेवारी रोजी ईडी कार्यालयात चौकशीदरम्यान, अधिकारी प्रतीक आणि शुभम यांनी आपल्यावर कबुली देण्यासाठी दबाव आणला आणि त्याच्यावर क्रूरपणे हल्ला केल्यामुळे त्याच्या डोक्याला दुखापत झाली, असा संतोष कुमार यांचा आरोप आहे. या प्रकरणात झारखंडची राजधानी रांची येथील विमानतळ पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी अंमलबजावणी संचालनालयाच्या प्रादेशिक कार्यालयावर धडक मारली. प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आणि पुरावे गोळा करण्यासाठी रांची पोलिसांचे एक पथक ईडी कार्यालयात पोहोचले.

चौकशीच्या नावाखाली क्रूरतेचे आरोप

तक्रारदार संतोष कुमार यांनी विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेल्या तक्रारीत अतिशय गंभीर दावे केले आहेत. त्यांच्या मते, 12 जानेवारी रोजी जेव्हा त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले असता प्रतीक आणि शुभम या दोन अधिकाऱ्यांनी त्यांच्याशी हिंसक वर्तन केले. त्यांना कबुली देण्यास भाग पाडताना अधिकाऱ्यांनी त्यांना क्रूरपणे मारहाण केली आणि त्यांचे डोकेही आपटले.

पुरावे शोधण्यासाठी पोलीस ईडी कार्यालयात

हल्ल्याचे आरोप गंभीर असल्याने रांची पोलीस कारवाईत उतरले आहेत. पोलिसांसह मोठ्या संख्येने अधिकारी ईडी कार्यालयात उपलब्ध डिजिटल पुरावे आणि कागदपत्रे तपासण्यासाठी पोहोचले. चौकशीदरम्यान मानवी हक्कांचे उल्लंघन झाले का आणि संतोष कुमारच्या दुखापतींसाठी केंद्रीय अधिकारी खरोखर जबाबदार होते का? हे तपासायचे आहे.

बंगालपाठोपाठ झारखंडमध्ये ‘वाद’

पश्चिम बंगालमधील ‘आय-पॅक’ छाप्यावरून अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि ममता बॅनर्जी सरकार आधीच सर्वोच्च न्यायालयापर्यंत आमने-सामने ठाकले असताना ही घटना घडली आहे. आता, झारखंड पोलिसांनी थेट ईडी कार्यालयात धडक मारल्यामुळे हे प्रकरण आणखी गुंतागुंतीचे झाले आहे.

Comments are closed.