मानखुर्द, गोवंडीत मतदारांची त्रेधातिरपीट

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी पालिका प्रशासनाने जोरदार तयारी केली असली, तरी निवडणूक आयोगाच्या ढिसाळ कारभारामुळे मतदारांची पुरती दमछाक झाली. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये मतदान करूनही आज मात्र पालिका निवडणुकीत मतदान करण्यापासून अनेक जण मुकले. अनेक मतदारांची नावे यादीतून गायब होती. नावे शोधताना मतदान केंद्रांवर एकच गोंधळ उडाला होता.

मानखुर्द, गोवंडी येथील प्रभाग क्रमांक 141 आणि 142 मध्ये सकाळपासूनच मतदार मतदानासाठी बाहेर पडले. सकाळी 10 वाजेपर्यंत मतदान केंद्रांवर गर्दी कमी होती; मात्र 11 नंतर ही गर्दी हळूहळू वाढू लागली. विविध मतदान केंद्रांबाहेर आपली नावे शोधण्यासाठी अनेक मतदार तसेच विविध पक्षांचे कार्यकर्ते धडपडत होते. वेगवेगळ्या बूथवर भेट देऊनही मतदार यादीत नावे न सापडल्याने अनेक मतदार निराश झाले. इतकेच नव्हे, तर वृद्ध आणि महिला मतदार मतदान केंद्रावरूनच माघारी फिरले.

दुपारी 2 नंतर मतदान केंद्रांवरील गर्दी ओसरली; मात्र मतदानाचा हक्क बजावण्यासाठी अनेक मतदारांना विविध मतदान केंद्रांवर हेलपाटे मारावे लागले. त्यामुळे संतप्त नागरिकांनी निवडणूक आयोगाच्या नावाने शिव्यांची लाखोली वाहिली.

अपंग व्यक्ती

मतदान केंद्रांवर अंध, अपंग आणि विकलांग मतदारांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक असतानाही मानखुर्द येथील पीएमजीपी कॉलनी, महाराष्ट्र नगर, शिवाजी नगर, साठे नगर आदी मतदान केंद्रांवर व्हीलचेअर किंवा अन्य सुविधा उपलब्ध नव्हत्या. यासंदर्भात तेथील निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले की, वृद्ध किंवा विकलांग व्यक्ती मतदानासाठी आल्यास त्यांना तातडीने मतदान करण्याची मुभा दिली जाईल.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या वेळी साठे नगर येथील शाळेत मतदान केंद्र होते आणि त्या वेळी मतदान केले होते. मात्र यावेळी मतदार यादीत नावच नव्हते. दुसऱ्या मतदान केंद्रावर घरच्यांना चौकशीसाठी पाठवले असता तेथेही नाव नसल्याचे आढळले.
ज्योती तिवारी, साठे नगर

मतदान करण्यासाठी 68 वर्षीय वृद्ध अम्मीला आणले होते; मात्र तिलादेखील गर्दीत ताटकळत उभे ठेवण्यात आले. तिची मोठी गैरसोय झाली. किमान ज्येष्ठ नागरिकांचा तरी प्रशासनाने विचार करायला हवा.
आफताब कुरेशी, शिवाजी नगर

इमारतीच्या कोनाड्यात मतदान केंद्रे

मतदारांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी शाळा तसेच प्रशस्त इमारतींमध्ये मतदान केंद्रे उभारणे गरजेचे असतानाही निवडणूक आयोगाने अनेक ठिकाणी इमारतींच्या कोनाड्यात मतदान केंद्रे उभारली होती. त्यामुळे एकाच वेळी अनेक मतदार तेथे पोहोचल्यास मतदान करणे अडचणीचे ठरत होते. याशिवाय गर्दी हाताळताना पोलिसांसह निवडणूक कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत होती.

Comments are closed.