विलासरावांचे नाव पुसायला निघालेल्या भाजपला लातूरकरांनी नाकारले, महापालिकेवर काँग्रेसची एकहाती सत्ता; भाजपची घोडदौड, 22 जागांवर थांबली

स्व. विलासराव देशमुखांच्या आठवणी पुसण्याची उद्दाम भाषा करणाऱया भाजपला लातूरकरांनी जबरदस्त हबाडा दिला. लातूर महापालिकेत काँग्रेसने आमदार अमित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली 43 जागांवर दणदणीत विजय मिळवला. एकहाती सत्ता आणणाऱया काँग्रेसच्या विजयाचे शिल्पकार ठरले भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण! काँग्रेससोबत आघाडीत असलेल्या वंचित बहुजन आघाडीने चार जागा मिळवल्या. अजित पवार गटाला एका जागेवर समाधान मानावे लागले.

लातूर महापालिकेच्या 18 प्रभागांसाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीची आज शासकीय महिला तंत्रनिकेतन येथे मतमोजणी करण्यात आली. सकाळी 10 वाजता मतमोजणीला प्रारंभ झाला. पहिल्या फेरीपासूनच मतमोजणीत काँग्रेसच्या उमेदवारांनी आघाडी घेतली. दुपारी 12 वाजता कल स्पष्ट होताच काँग्रेस उमेदवारांनी जल्लोष करण्यास सुरुवात केली. काँग्रेसने 43 जागा मिळवून महापालिकेवर एकहाती सत्ता आणली. आमदार अमित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने हा दिमाखदार विजय मिळवला.

भाजपला बंडखोरीचा सुरुंग

निष्ठावंतांना डावलून उपऱ्यांना तिकीट दिल्यामुळे भाजपमध्ये असंतोष उफाळून आला होता. निवडणूक प्रभारी संभाजी पाटील निलंगेकर यांनी तिकीट वाटपात गोलमाल केल्याचा आरोप करत तिकीट डावललेल्या निष्ठावंतांनी वेगळी चूल मांडली. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी जंग जंग पछाडूनही त्यांना बंड शमवता आले नाही. आम्ही विजयी झालो नाही तरी चालेल पण उपऱ्यांना पाडणार, अशी या निष्ठावंतांची भूमिका होती. बंडखोरीचा सुरुंग लागल्याने भाजपला 22 जागांवरच समाधान मानावे लागले.

काँग्रेसच्या विजयाला भाजपचा हातभार

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी प्रचारसभेत बोलताना ‘भाजप कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून लातुरातून विलासराव देशमुखांच्या आठवणी पुसल्या जातील यात काही शंका नाही’ असे विधान केले. या विधानामुळे लातूरकरांच्या अस्मितेला ठेच पोहोचली आणि प्रचंड त्वेषाने लातूरकरांनी भाजपच्या विरोधात मतदान केले. परिणामी काँग्रेसला 43 जागांवर घवघवीत यश मिळाले.

सोलापुरात दिग्गजांचा पराभव

सोलापूर महापालिकेत भारतीय जनता पक्षाने 87 जागा मिळवून बहुमत पटकावले. मात्र या निवडणुकीत अनेक दिग्गजांना पराभवाचा फटका बसला आहे.

या निवडणुकीत एमआयएमने दोन जागा जिंकल्या. शिंदे गटालाही चार, काँगेसला दोन, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला एक जागा मिळाली आहे. या निवडणुकीत माजी महापौर मनोहर सपाटे, अरीफ शेख, अलका राठोड, उमरखान बेरिया, संजय हेमगड्डी तसेच माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, राजेंद्र कळंत्री, स्थायीचे माजी सभापती पद्माकर काळे यांचा पराभव झाला. मनसे युवा नेते बाळासाहेब सरवदे यांची हत्या झाली त्या प्रभाग क्रमांक 2क मधील भाजपा उमेदवार शालन शिंदेसह प्रभाग 2मधील भाजपाचे चारही उमेदवार निवडून आले आहेत.

Comments are closed.