WPL 2026 मध्ये आरसीबीचा दबदबा, गुजरातला नमवून सलग तिसऱ्या विजयाची नोंद!
महिला प्रीमियर लीग (WPL) 2026 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरू (RCB) संघाचा विजयरथ सुरूच आहे. स्मृती मंधानाच्या नेतृत्वाखालील आरसीबीने गुजरात जायंट्सवर 32 धावांनी मात करत सलग तिसरा विजय नोंदवला शिवाय गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले. नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये खेळल्या गेलेल्या स्पर्धेच्या नवव्या सामन्यात आरसीबीने अप्रतिम कामगिरी करत आपले वर्चस्व पुन्हा सिद्ध केले.
प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने 20 षटकांत 7 गडी गमावून 182 धावांचा मजबूत स्कोर उभारला. मात्र सुरुवात निराशाजनक ठरली होती. संघाचे चार फलंदाज अवघ्या 43 धावांत बाद झाले. अशा अडचणीच्या क्षणी राधा यादव आणि रिचा घोष यांनी जबाबदारी स्वीकारत डाव सावरला. पाचव्या विकेटसाठी या जोडीने 105 धावांची निर्णायक भागीदारी करत संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचवले.
राधा यादवने 47 चेंडूत 66 धावांची झुंजार खेळी केली, तर रिचा घोषने 28 चेंडूत 44 धावा करत आक्रमक फलंदाजीचे दर्शन घडवले. गुजरातकडून युवा वेगवान गोलंदाज काशवी गौतमने 42 धावांत 2 विकेट्स घेतल्या. तर सोफी डिवाइनने 31 धावांत 3 विकेट्स घेत आरसीबीच्या फलंदाजांना काही प्रमाणात रोखले.
183 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरात जायंट्सची फलंदाजी पूर्णपणे कोलमडली. श्रेयंका पाटीलच्या घातक गोलंदाजीसमोर गुजरातची फलंदाजी पत्त्यांप्रमाणे ढासळली. श्रेयंका पाटीलने अवघ्या 3.5 षटकांत 23 धावा देत 5 विकेट्स घेत ‘पंजा’ उघडला. तिला लॉरेन बेलने 3 विकेट्स घेत चांगली साथ दिली.
गुजरातकडून भारती फूलमालीने सर्वाधिक 39 धावा केल्या. सलामीवीर बेथ मूनीने 27 धावा केल्या, मात्र इतर फलंदाज अपयशी ठरले. सोफी डिवाइन फक्त 8 धावांवर, तर कर्णधार ॲश्ले गार्डनर अवघ्या 3 धावांवर बाद झाली.
Comments are closed.