पुण्यामध्ये अजित पवारांना धक्का
पुणे महापालिकेत सत्तेसाठी जोर लावलेल्या दोन्ही राष्ट्रवादींना जोरदार धक्का बसला आहे. भाजपने 120 जागा मिळवून जोरदार मुसंडी मारल्याने पुण्यात पुन्हा कमळ फुलले आहे. भाजपची एकहाती सत्ता आली असून घड्याळय़ाचा अलार्म वाजलाच नाही. पालिकेतील 165 पैकी अवघ्या 26 जागांवरच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला समाधान मानावे लागले आहे. काँग्रेस 15, राष्ट्रवादी शरद पवार गटाला 3 तर शिवसेनेला एका जागेवर विजय मिळाला.
या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी पक्षांना मोठा धक्का बसला आहे. 2017 च्या निवडणुकीत भाजपच्या लाटेतही दोन्ही राष्ट्रवादीच्या मिळून 42 जागा आल्या होत्या. गेल्या निवडणुकीपेक्षा राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची संख्या 16 ने घटली. तर काँग्रेसची 9 वरून संख्या 15 वर गेली आहे. तर, भाजपने 99 वरून 120 वर उडी मारली आहे.
शिंदे गटाला भोपळा
महायुतीत एकत्र असलेल्या शिंदे गटाला ऐनवेळी भाजपने तुरी देत युती तोडली. स्वबळाची भाषा करत निवडणुकीला सामोरे गेलेल्या शिंदे गटाला एकही जागेवर विजय मिळवता आला नाही.
अवघ्या 22 व्या वर्षी थोपटे नगरसेविका
प्रभाग क्र.36 क मधून सई थोपटे ही अवघ्या 22 व्या वर्षी नगरसेवक झाली आहे. प्रभाग क्रमांक 21 ब मधून सिध्दी शिळीमकर ही 23 व्या वर्षी नगरसेविका झाली आहे. त्यामुळे सर्वांत कमी वयात नगरसेवक होण्याचा मान दोघींना मिळाला.
आबा बागुल यांचा मान हुकला
पुणे महापालिकेत काँग्रेसचे आबा बागुल यांनी सलग सहा वेळा नगरसेवक होऊन इतिहास निर्माण केला होता. यंदाच्या निवडणुकीत दारुण पराभवामुळे बागुल यांचा सलग सातव्यांदा नगरसेवक होण्याचा मान हुकला.
जेलमधून लढून सोनाली व लक्ष्मी आंदेकर विजयी
जेलमधून निवडणूक लढलेल्या सोनाली वनराज आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर या दोघी प्रभाग क्रमांक 23 रविवार पेठ, नाना पेठ येथून विजयी झाल्या. नाना पेठेतील टोळी युद्ध आणि आरोपींना मिळालेली उमेदवारी यामुळे शहरासह राज्याचे या प्रभागाकडे लक्ष लागले होते.
पिंपरी-चिंचवडमध्ये दिग्गजांना धक्का
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत भाजपच्या माजी महापौर उषा ढोरे, उपमहापौर सचिन चिंचवडे, माजी सभागृह नेते नामदेव ढाके, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विलास मडिगेरी, संतोष लोंढे, सिमा सावळे यांना धक्कादायकपणे पराभवाला सामोरे जावे लागले. 2017 च्या सभागृहातील 26 नगरसेवकांना पराभवाचा सामना करावा लागला. तर माजी महापौर शपुंतला धराडे, माजी विरोधी पक्षनेत्या सुलभा उबाळे पुन्हा सभागृहात आल्या आहेत.
पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या 32 प्रभागांमध्ये 128 जागांसाठी निवडणूक झाली. रवी लांडगे, सुप्रिया चांदगुडे यांच्या माध्यमातून भाजपचे दोन नगरसेवक बिनविरोध झाल्याने 126 जागांसाठी मतदान झाले. या निवडणुकीत भाजपचे 84, राष्ट्रवादीचे 37, शिंदे गटाचे 6 तर 1 अपक्ष असे 128 नगरसेवक निवडून आले आहेत. पक्षांतर केलेले 28 नगरसेवक विजयी झाले तर पक्षांतर करणा-या 11 जणांवर पराभवाची नाम्ष्की ओढावली.
बावधनमध्ये विजयी मिरवणुकीत आग
पुणे महापालिका निवडणुकीतील भाजप उमेदवाराच्या विजयोत्सवादरम्यान गुलालाची उधळण सुरु असताना फटाक्याची ठिणगी गुलालावर पडल्याने आगीचा भडका उडाला. यामध्ये सात जण जखमी झाले. ही घटना बावधनमधील पाटीलनगर येथे शुक्रवारी घडली.
Comments are closed.