हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीच्या वर्षात मराठी माणसाशी बेईमानी आणि गद्दारी झाली – संजय राऊत
एकनाथ शिंदे जर ‘जयचंद’ ठरले नसते, तर भाजपच्या 100 पिढ्या उतरल्या असत्या तरी मुंबईवर महाराष्ट्रद्वेष्ट्यांचा महापौर बसला नसता असा घणाघात संजय राऊत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांनी केला. तसेच हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीच्या वर्षात मराठी माणसाशी बेईमानी आणि गद्दारी झाली असेही संजय राऊत म्हणाले.
आज मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, संजय राऊत म्हणाले, माननीय राज ठाकरे आणि माननीय उद्धव ठाकरे या दोघांना मिळून आम्ही 71 जागा जिंकल्या. एवढ्या प्रतिकूल परिस्थितीतही मराठी माणूस आमच्या मागे ठामपणे उभा राहिला. त्यामुळे हे प्रश्न निरर्थक आहेत. या परिस्थितीत 71 जागा जिंकणे ही मोठी अचिव्हमेंट आहे.
ते पुढे म्हणाले की, सत्ता नाही, हे मान्य आहे. पण कालच मी समाजमाध्यमांवर ट्विट केले होते. एकनाथ शिंदे जर ‘जयचंद’ ठरले नसते, तर भाजपच्या 100 पिढ्या उतरल्या असत्या तरी मुंबईवर भाजपचा – म्हणजे महाराष्ट्रद्वेष्ट्यांचा – महापौर बसला नसता आणि झेंडा फडकला नसता.
राऊत यांनी ऐतिहासिक संदर्भ देताना सांगितले की, शनिवारवाड्यावर मराठ्यांचा जरीपटका उतरवून ब्रिटिशांचा युनियन जॅक फडकवणारा बाळाजीपंत नातू आठवतो. त्या अवलादीचे लोक आजही आहेत. जर ही जयचंदगिरी झाली नसती, तर मुंबईत भाजप कधीच महापौर करू शकली नसती.
ते म्हणाले, आज भाजप आणि शिंदे गटाकडे केवळ तीन जागांचे बहुमत आहे. सभागृहात सुमारे 110 सदस्य विरोधात आहेत. शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, काँग्रेस आणि इतर पक्ष मिळून शंभरहून अधिक विरोधक आहेत. ही ताकद कधीच नव्हती. मुंबईच्या बाबतीत चुकीचे काहीही होऊ देणार नाही.
महापौर पद गमावल्याबद्दल बोलताना ते म्हणाले, हे महाराष्ट्राचे आणि मुंबईकरांचे दुर्दैव आहे. हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीच्या वर्षात मराठी माणसाशी बेईमानी आणि गद्दारी झाली आहे. बाळासाहेबांच्या मुंबईत गौतम अदाणीचा झेंडा फडकवण्यात आला आहे. मराठी माणूस हे कधीही माफ करणार नाही.
राऊत पुढे म्हणाले की, आज ते सत्तेत आहेत, काही काळ राहतीलही. पण भविष्यात एकनाथ शिंदे आणि त्यांच्या लोकांना मुंबईत आणि महाराष्ट्रात फिरणे कठीण होईल. मराठी माणूस अत्यंत संतापलेला आहे. ठाकरे बंधूंच्या मागे तो अभूतपूर्वपणे उभा राहिला आहे. ते म्हणाले, मनसे आणि शिवसेनेच्या 12 ते 13 जागा अत्यल्प मतांच्या फरकाने पडल्या. अनेक ठिकाणी 50 ते 200 मतांचा फरक होता. मोठा संघर्ष झाला असेही संजय राऊत म्हणाले.
Comments are closed.