मालेगाव महापालिकेत इस्लाम पार्टीने सगळ्यांनाच झोपवलं, भाजप तोंडघशी आपटली; निवडणुकीतील 10 महत्वा

मालेगाव निवडणूक निकाल 2026: मालेगाव महापालिका निवडणुकीतील पूर्व भागात मालेगाव सेक्युलर फ्रंट मधील ‘इस्लाम’ पार्टीने 35 व समाजवादी पार्टीने 6 जागा मिळवत निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. तर पश्चिम भागात शिवसेनेने (शिंदे गट) 18 जागा मिळवत आपला करिष्मा कायम ठेवला. माजी आमदार आसिफ शेख यांनी प्रथमच महापालिका निवडणुकीत लढलेल्या इस्लाम पक्षाचा मालेगावात महापौर बसवण्याचा मार्ग मोकळा झालाय. समाजवादी पार्टी व शिवसेना (शिंदे गट) पक्षाचा पाठिंबा घेत सत्ता स्थापन होण्याची शक्यता आहे.

या निवडणुकीत एमआयएम पक्षाला 20, काँग्रेसला 3 तर भाजपला 2 जागा मिळाल्या. महापालिकेतील माजी गटनेते सुनील गायकवाड, भाजपचे महानगर प्रमुख देवा पाटील यांना पराभव पत्करावा लागला. इस्लामच्या माजी महापौर ताहेरा शेख, शिंदे गटाचे माजी उपमहापौर नीलेश आहेर व नरेंद्र सोनवणे हे विजयी झाले आहेत. एमआयएमचे माजी महापौर अब्दुल मलिक यांना मात्र या निवडणुकीत पराभूत व्हावे लागले. काँग्रेसचे महानगर प्रमुख एजाज बेग हे विजय झाले आहेत. शिवसेना (ठाकरे गट) राष्ट्रवादी (अजित पवार गट) राष्ट्रवादी (शरद पवार गट) वंचित आघाडी, आप, बसपा या पक्षांना एकही जागा जिंकता आली नाही. महापालिकेच्या एकूण 84 जागांपैकी इस्लाम पक्षाची एक जागा बिनविरोध झाली होती.

Malegaon Election Results 2026: भाजप तोंडघशी आपटली

मंत्री दादा भुसे यांनी महायुतीचा धर्म पाळत या निवडणुकीत युतीसाठी हात पुढे केला. मात्र भाजपमधील अंतर्गत गटबाजी व काही नव्या चेहऱ्यांनी यात युती न करण्याचा टोकाचा निर्णय घेतला खरा. मात्र, भाजपचा हा निर्णय चुकला आणि या निवडणुकीत सपाटून पराभव स्वीकारावा लागला. भाजपने 20 उमेदवार उभे केले होते. त्यातील 18 जणांना पराभव पत्करावा लागला आहे.

Malegaon Election Results 2026: मालेगाव महापालिका निवडणुकीतील 10 महत्वाचे मुद्दे

1. मालेगावी मंत्री दादा भुसे व माजी आमदार आसिफ शेख यांच्या विकासाला कौल.

2. एमआयएमला चुकलेल्या उमेदवार निवडीचा फटका.

3. राष्ट्रवादी (अजित पवार) , राष्ट्रवादी (शरद पवार) शिवसेना (ठाकरे गट), वंचित बहुजन आघाडी यांना या निवडणुकीत खातेही उघडता आले नाही.

4. भाजपचे माजी महानगर अध्यक्ष व गटनेते यापूर्वी चार वेळा महापालिकेत निवडून गेलेले त्यांचा या निवडणुकीत पराभव झाला..

5. मंत्री दादा भुसे यांचे कट्टर समर्थक युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष विनोद वाघ यांचा पराभव.

6. शिवसेना – भाजप युती भाजप नेत्यांकडून फिस्कटवली गेली, अन् त्याचा फटका निवडणुकीत बसल्याने भाजप तोंडघशी पडली. केवळ 2 जागा मिळाल्या.

7. माजी महापौर ताहेरा शेख व त्यांचे सुपुत्र इम्रान शेख यांचा या निवडणुकीत विजय झाला.

8. या निवडणुकीत तीन दाम्पत्यांनी विजय मिळवला, समाजवादीचे नेते मुस्तकीम डीग्निटी व त्यांच्या पत्नी शान ए हिंद हे विजयी झाले. काँग्रेसचे इजाज बेग व त्यांच्या पत्नी यास्मिन बेग हे दांपत्य दुसऱ्यांदा सभागृहात पोहोचले. इस्लाम पार्टीचे खालीद शेख व त्यांच्या पत्नी नसरीन शेख हे देखील विजयी झाले..

9. एमआयएमचे आमदार मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांचे पुत्र हाफिज अब्दुल्ला यांचा मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विजयी होत राजकारणात प्रवेश झाला.

10. स्थानिक कार्यकर्त्यांची स्थानिक पार्टी, प्रभावी संघटन, योग्य उमेदवारांची निवड, नागरी सुविधा व जनतेच्या प्रश्नावर आक्रमकता ही इस्लाम पार्टीच्या विजयाची उजवी बाजू ठरली.

आणखी वाचा

Malegaon Election Results 2026: मालेगाव महानगरपालिका निवडणूक 2026 : प्रभाग 1 ते 21 मध्ये ‘असा’ रंगला सामना, विजयी उमेदवारांची यादी पाहा इथे…

आणखी वाचा

Comments are closed.