बीसीसीआयला नडणाऱ्या बांगलादेशविरुद्ध वैभव सूर्यवंशीचा धमाका; आता विराट कोहलीलाही टाकले मागे, रच

वैभव सूर्यवंशी भारत U19 विरुद्ध बांगलादेश U19 : भारताचा युवा संघ सध्या 19 वर्षांखालील वर्ल्डकप 2026 स्पर्धेत खेळत असून दुसरा सामना बांगलादेशविरुद्ध होत आहे. भारत आणि बांगलादेश या युवा संघातील सामना आज बुलावायो येथे खेळवला जात असून या सामन्यात 14 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने तांडव घातला. आत्मविश्वासपूर्ण फलंदाजी करत वैभवने या सामन्यात अर्धशतक झळकावले. हे अर्धशतक अंडर-19 वर्ल्ड कपमधील त्याचे पहिलेच अर्धशतक ठरले.

अवघ्या 30 चेंडूमध्ये अर्धशतक

भारतीय संघाची सुरुवात या सामन्यात अत्यंत खराब झाली होती. अवघ्या 12 धावांत भारताचे पहिले दोन फलंदाज तंबूत परतले होते. अशा कठीण परिस्थितीत वैभव सूर्यवंशीने जबाबदारी स्वीकारत डाव सावरला. चांगल्या चेंडूवर संयम दाखवत, तर सैल चेंडूवर आक्रमक फटकेबाजी करत त्याने संघाला स्थैर्य दिले. वैभवने फक्त 30 चेंडूमध्ये अर्धशतक पूर्ण केले. पण तो 72 धावा करून  आऊट झाला, या खेळीदरम्यान त्याने 3 षटकार आणि 6 चौकार लगावले. या सामन्यात भारतीय कर्णधार आयुष म्हात्रे केवळ 6 धावांवर बाद झाला, तर वेदांत त्रिवेदी खाते न उघडता तंबूत परतला. वैभवने विहान मल्होत्रासोबत डाव सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र विहानही 7 धावांवर बाद झाला आणि भारताचा तिसरा विकेट 53 धावांवर पडला.

सर्वात कमी वयात अर्धशतक करणारा खेळाडू

या अर्धशतकासह वैभव सूर्यवंशीने ऐतिहासिक विक्रम आपल्या नावावर केला आहे. अंडर-19 वनडे वर्ल्ड कपमध्ये सर्वात कमी वयात अर्धशतक करणारा खेळाडू बनण्याचा मान वैभवने मिळवला. त्याने हा पराक्रम 14 वर्षे 296 दिवस या वयात साध्य केला. यापूर्वी हा विक्रम अफगाणिस्तानच्या शाहिदुल्लाह कमाल यांच्या नावावर होता, ज्यांनी 2014 साली 15 वर्षे 19 दिवस वयात अर्धशतक केले होते. वैभवने त्यांना मागे टाकत अव्वल स्थान पटकावले. याशिवाय, वैभवने 25 धावा पूर्ण करताच युवा वनडेमधील 1000 धावांचा टप्पाही ओलांडला, ज्यामुळे त्याच्या या खेळीला आणखी ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले.

वैभव सूर्यवंशीने विराट कोहलीलाही टाकले मागे; यूथ वनडेतील मोठा पराक्रम

वैभव सूर्यवंशीने आणखी एक मोठा टप्पा पार करत विराट कोहलीलाही मागे टाकले आहे. आतापर्यंत यूथ वनडे इंटरनॅशनलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट कोहली आठव्या स्थानावर होता. कोहलीने 25 डावांत 46.57 च्या सरासरीने 978 धावा केल्या होत्या. मात्र बांग्लादेशविरुद्धच्या सामन्यात केवळ 4 धावा करताच वैभव सूर्यवंशीच्या नावावर 979 धावा झाल्या आणि त्याने कोहलींना मागे टाकत यादीत आघाडी घेतली. विशेष म्हणजे, वैभवने हा पराक्रम फक्त 20 डावांत साध्य केला आहे. या 20 डावांत त्याने 3 शतके आणि 4 अर्धशतके झळकावली आहेत. दुसरीकडे, विराट कोहलींनी यूथ वनडेमध्ये 1 शतक आणि 6 अर्धशतके नोंदवली होती.

हे ही वाचा –

Suryakumar Yadav and Khushi Mukherjee : सूर्यकुमार यादवचं प्रकरण न्यायालयात; अभिनेत्रीवर 100 कोटींचा मानहानी दावा, नेमकं काय घडलं?

आणखी वाचा

Comments are closed.