इराण अजूनही पेटलेलेच, हिंसक निदर्शनांमध्ये ३,००० हून अधिक लोकांचा मृत्यू

इराणमध्ये डिसेंबर २०२५ च्या अखेरीस सुरू झालेल्या राष्ट्रव्यापी विरोध प्रदर्शनांनी हिंसक रूप धारण केले असून येथे गेल्या १९ दिवसांत ३,००० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. असा दावा विविध मानवाधिकार संघटना आणि रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. ही संख्या १९७९ च्या इस्लामिक क्रांतीनंतर इराणमधील सर्वात मोठ्या अंतर्गत संघर्षांपैकी एक ठरली आहे.

अमेरिकेतील ह्युमन राइट्स अॅक्टिव्हिस्ट्स न्यूज एजन्सीने (HRANA) दिलेल्या माहितीनुसार, एकूण ३,०९० लोकांचा मृत्यू झाला असून यापैकी सुमारे २,८८५ जण हे प्रदर्शनकारी होते. हे प्रदर्शन प्रामुख्याने आर्थिक संकट, चलनात घसरण, महागाई आणि धार्मिक नेत्यांच्या शासनाविरोधात सुरू झाले होते, जे नंतर सरकारच्या विरोधात मोठ्या प्रमाणात पसरले.

सरकारने या हिंसाचाराला अमेरिका आणि इस्रायल यांच्या समर्थित “सशस्त्र गुंडांचे” कृत्य म्हटले आहे. सुरक्षादलांनी प्रदर्शन दडपण्यासाठी गोळीबार, लाठीचार्ज, अश्रूधूर आणि मोठ्या प्रमाणात अटकसत्र केले. देशभरात ८ दिवस (सुमारे २०० तास) पूर्ण इंटरनेट बंदी घालण्यात आली होती, जी आता आंशिकपणे सुरू करण्यात आली आहे. इंटरनेट मॉनिटरिंग संस्था NetBlocks नुसार, सध्या कनेक्टिव्हिटी फक्त २ टक्के इतकीच आहे, ज्यामुळे मर्यादित सेवा आणि एसएमएस उपलब्ध आहेत.

Comments are closed.