देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन आता सेवेत आहे.

पंतप्रधानांनी दाखविला हिरवा झेंडा : हावडा-गुवाहाटी हे 958 किमी अंतर 14 तासात पार करणार

सर्कल/कोलकाता, मालदा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी पश्चिम बंगालमधील मालदा टाउन येथून देशातील पहिल्या वंदे भारत स्लीपर ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. या अतिजलद ट्रेनचा कमाल वेग ताशी 180 किमी आहे. सध्याच्या 17 तासांच्या तुलनेत ही ट्रेन पश्चिम बंगालमधील हावडा ते गुवाहाटी (कामाख्या) दरम्यानचे 958 किमी अंतर फक्त 14 तासात पूर्ण करणार असल्याने प्रवाशांचे जलद आणि आरामदायी प्रवासाचे स्वप्न साकार होणार आहे.

वंदे भारत स्लीपर ट्रेन ही भारतीय रेल्वेच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक पाऊल मानली जाते. आतापर्यंत वंदे भारत ट्रेन फक्त चेअर कारमध्ये चालत होत्या, परंतु स्लीपर आवृत्ती सुरू झाल्यामुळे लांब पल्ल्याच्या रात्रीच्या प्रवासात पूर्णपणे बदल होईल. ही ट्रेन विशेषत: जलद, सुरक्षित आणि आरामदायी रात्रीचा प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांसाठी एक मोठी दिलासा देणारी ठरेल. या ट्रेनमध्ये ‘कवच’ सुरक्षा व्यवस्था असल्याने अपघाताचा धोका जवळपास शून्य आहे. तसेच आधुनिक शौचालये, आधुनिक पेंट्री आणि आरामदायी आसनव्यवस्था असल्याने प्रवाशांना दर्जेदार सुविधा मिळणार आहेत. प्रवाशांना सुरळीत आणि व्यवस्थित सेवा मिळावी यासाठी सर्व ऑनबोर्ड कर्मचारी निर्धारित गणवेशात उपस्थित राहतील.

वंदे भारत स्लीपर ट्रेनची एकूण प्रवासी क्षमता 1,128 आहे. तिच्या 16 कोचमध्ये 11 एसी-3 टियर कोच, चार एसी-2 टियर कोच आणि एक फर्स्ट एसी कोच समाविष्ट आहे. थर्ड एसी स्लीपर ट्रेनचे भाडे 2,300 रुपये निश्चित करण्यात आले आहे. सेकंड एसीचे भाड 3,000 रुपये असेल. फर्स्ट एसीचे भाडे अंदाजे 3,600 रुपये आहे. राजधानी एक्स्प्रेससारख्या प्रीमियम ट्रेनपेक्षा भाडे थोडे जास्त आहे.

वैशिष्ट्यापूर्णता….

आरामदायी कोच : वंदे भारत स्लीपर ट्रेन आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रवाशांच्या सोयी लक्षात घेऊन डिझाइन करण्यात आली आहे. तिचे आतील भाग भारतीय संस्कृती लक्षात घेऊन डिझाइन करण्यात आल्यामुळे कोचचे वातावरण आरामदायी आणि आकर्षक बनते. लांब प्रवासातही थकवा जाणवू नये अशापद्धतीने बर्थ, प्रकाशयोजना आणि कोचची रचना डिझाइन करण्यात आली आहे.

स्वच्छतेची विशेषता : या ट्रेनमध्ये स्वच्छता आणि आरोग्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. जंतुनाशक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. कोचमध्ये यूव्हीसी तंत्रज्ञान बसवण्यात आले असून ते हवेतील विषाणू आणि बॅक्टेरिया नष्ट करण्यास मदत करते. ही प्रणाली हवा फिल्टर करते आणि स्वच्छ करते. शुद्ध हवेमुळे प्रवाशांना सुरक्षित वातावरण मिळते.

‘कवच’ सुरक्षा प्रणाली : सुरक्षेच्या बाबतीतही ट्रेन खूप प्रगत आहे. ती ‘कवच’ स्वयंचलित ट्रेन संरक्षण प्रणालीने सुसज्ज आहे. ट्रेनच्या वेगाचे आणि सिग्नलिंगचे सतत निरीक्षण सुरू असल्यामुळे अपघातांचा धोका लक्षणीयरीत्या कमी होतो. आपत्कालीन टॉक-बॅक युनिट देखील सक्रिय असल्यामुळे प्रवाशांना आपत्कालीन परिस्थितीत थेट ट्रेन कर्मचाऱ्यांशी संपर्क साधता येतो.

ट्रेनची रचना : चालकाचे केबिन देखील आधुनिक नियंत्रण आणि सुरक्षा प्रणालींनी सुसज्ज आहे. या ट्रेनची बाह्य रचना वायुगतिकीय असल्यामुळे सुरळीत प्रवास आणि कमी ऊर्जेचा वापर होतो. तिचे दरवाजे पूर्णपणे स्वयंचलित असल्याने स्टेशनवर थांबल्यानंतर आणि सुटताना आपोआप दरवाजे उघडतील आणि बंद होतील.

वेग व प्रीमियम सुविधा : वंदे भारत स्लीपर ट्रेनचा कमाल वेग ताशी 180 किलोमीटर असेल, तर सामान्य ऑपरेशन दरम्यान ती ताशी अंदाजे 130 किलोमीटर वेगाने धावेल. प्रवाशांना उच्च दर्जाचे ब्लँकेट, कव्हर आणि प्रगत बेडरोल प्रदान केले जातील. जेवण किंवा पेय समस्या येऊ नयेत यासाठी केटरिंग सेवा देखील उपलब्ध असतील.

Comments are closed.