आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाची विजयी घोडदौड, बांग्लादेशचा पराभव

आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखालील भारतीय अंडर-19 संघाने शनिवारी, 17 जानेवारी रोजी बांग्लादेशवर थरारक विजय नोंदवत अंडर-19 विश्वचषक 2026 च्या सुपर-6 फेरीसाठी अधिकृतपणे पात्रता मिळवली. या विजयासह भारत स्पर्धेत सहभागी असलेल्या 16 संघांपैकी सुपर-6 चे तिकीट मिळवणारा पहिला संघ ठरला आहे. यापूर्वी भारताने आपल्या पहिल्या सामन्यात यूएसएवर एकतर्फी विजय मिळवला होता.

बांग्लादेशविरुद्धच्या या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना दमदार कामगिरी केली. युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याने 72 धावांची खेळी केली, तर अभिज्ञान कुंदूने 80 धावांची संयमी खेळी साकारली. या दोघांच्या जोरावर भारताने मर्यादित षटकांत 238 धावा फलकावर लावल्या. पावसामुळे सामना खंडित झाल्यानंतर डकवर्थ-लुईस नियमानुसार बांग्लादेशला 165 धावांचे लक्ष्य देण्यात आले.

लक्ष्य तुलनेने सोपे वाटत असले तरी भारतीय गोलंदाजांनी सामन्यावर पूर्ण नियंत्रण मिळवले. विशेषतः विहान मल्होत्रा याने अप्रतिम गोलंदाजी करत अवघ्या 4 षटकांत 14 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. त्याच्या या आक्रमक माऱ्यामुळे बांग्लादेशचा डाव कोलमडला आणि भारताने सामना आपल्या नावावर केला. विहानच्या या कामगिरीने सामन्याचे चित्रच पालटले आणि भारताच्या विजयात तो निर्णायक ठरला.

दरम्यान, शनिवारी झालेल्या दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेने जपानवर तब्बल 203 धावांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयामुळे श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाला मागे टाकत गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले. सध्या ग्रुप-ए मध्ये भारत, ग्रुप-बी मध्ये इंग्लंड, ग्रुप-सी मध्ये श्रीलंका आणि ग्रुप-डी मध्ये वेस्टइंडीज आघाडीवर आहेत.

आज, रविवारी 18 जानेवारी रोजी अंडर-19 विश्वचषकात तीन महत्त्वाचे सामने खेळवले जाणार आहेत. वेस्टइंडीजचा सामना अफगाणिस्तानशी, इंग्लंडचा जिम्बाब्वेशी तर न्यूझीलंडचा यूएसएशी होणार आहे. या सामन्यांमध्ये वेस्टइंडीज आणि इंग्लंडकडे सुपर-6 फेरीसाठी पात्र ठरण्याची मोठी संधी असणार आहे.

Comments are closed.