WPL: शैफाली वर्माचा मोठा पराक्रम, स्पेशल अर्धशतक पूर्ण; आतापर्यंत कोणालाही जमलं नाही!
महिला प्रीमियर लीग (WPL) 2026 मधील 11व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध 8 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात दिल्लीकडून सलामीवीर शफाली वर्माने एकाकी झुंज देत शानदार अर्धशतकी खेळी केली. शफालीने 41 चेंडूंमध्ये 62 धावा केल्या, ज्यात 5 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. मात्र तिच्या या झुंजार खेळीचा संघाला फारसा फायदा झाला नाही. दिल्लीला पराभवाचा सामना करावा लागला.
या सामन्यात शफाली वर्माने एक ऐतिहासिक विक्रम आपल्या नावावर केला. WPL कारकिर्दीतील हे तिचे सातवे अर्धशतक ठरले. याच खेळीच्या जोरावर शफाली WPL इतिहासात 50 षटकार पूर्ण करणारी पहिली क्रिकेटपटू बनली. तिने केवळ 31 सामन्यांत ही कामगिरी करत नवा इतिहास रचला. शैफालीनंतर WPL मध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूंमध्ये रिचा घोष आणि ऑस्ट्रेलियाची अॅश्ले गार्डनर यांचा समावेश आहे. दोघींनी 29 सामन्यांत प्रत्येकी 32 षटकार लगावले आहेत. तर सोफी डिवाइन आणि हरमनप्रीत कौर यांनी प्रत्येकी 30 षटकार मारले आहेत.
सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, दिल्ली कॅपिटल्सची सुरुवात अत्यंत खराब झाली. अवघ्या दोन षटकांत चार महत्त्वाच्या विकेट्स गमावल्याने दिल्ली संघ बॅकफुटवर गेला. पहिल्याच षटकात लिझेल ली 4 धावा करून बाद झाली, तर लॉरा वोल्वार्ड्ट शून्यावर माघारी परतली. दुसऱ्या षटकात सयाली सतघरेने कर्णधार जेमिमा रोड्रिग्स (4) आणि मारिजान कॅप (0) यांना तंबूत पाठवत दिल्लीची स्थिती आणखी बिकट केली.
या संकटात शफाली वर्माने एक टोक धरत संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचवले. तिने चौथ्या षटकात सयाली सतघरेच्या गोलंदाजीवर षटकार ठोकताच WPL मधील आपल्या 50 षटकारांचा टप्पा गाठला. मात्र इतर फलंदाज अपयशी ठरल्याने दिल्लीचा डाव 20 षटकांत 166 धावांत संपुष्टात आला. अखेरीस आरसीबीने हे आव्हान सहज पार करत सामना आपल्या नावावर केला.
Comments are closed.