थंडीची लाट आणि धुक्याने उत्तर भारतात कहर केला आहे.

दिल्ली-एनसीआरमध्ये दृश्यमानता शून्य, काश्मीर-हिमाचल प्रदेशमध्ये हिमवर्षाव

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

उत्तर भारतातील अनेक भागात तीव्र थंडी आणि धुक्याचा कहर सुरूच आहे. शनिवारी सकाळी दिल्ली, एनसीआर आणि त्याच्या आसपासच्या भागात दाट धुक्याची चादर पसरली होती. धुक्यामुळे समोरचे काहीही दिसत नसल्यामुळे रस्त्यांवरील वाहनांचा वेग लक्षणीयरीत्या मंदावला होता. परिस्थितीची तीव्रता लक्षात घेत हवामान खात्याने ही थंडीची लाट आणि दाट धुके पुढील काही दिवस कायम राहील असा इशारा जारी केला आहे. नजिकच्या काळात काही भागात तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे. शनिवारी सकाळी दिल्लीतील पारा 7 अंश सेल्सिअसपर्यंत घसरला होता. तर नोएडा आणि उत्तर प्रदेशातील इतर शहरांमध्ये किमान तापमान 5 अंशांच्या आसपास नोंद झाले होते.

हवामान खात्याने उत्तर प्रदेशातील लोकांसाठी आणखी एक महत्त्वाची माहिती शेअर केली आहे. पुढील दोन दिवसांत पश्चिम आणि पूर्व उत्तर प्रदेशात दाट धुके राहण्यासोबतच 18 आणि 19 जानेवारी रोजी राज्यातील अनेक भागात पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली. थंडीमुळे नोएडा, ग्रेटर नोएडा, सहारनपूर, बदायूं आणि संभल येथे आठवीपर्यंतच्या शाळा बंद आहेत. धुक्यामुळे सकाळी 7 वाजेपर्यंत अमृतसरमध्ये दृश्यमानता शून्य होती. दिल्लीत दाट धुक्यामुळे दृश्यमानता 20 मीटरपेक्षा कमी झाली.

डोंगराळ राज्यांमध्ये येत्या काही दिवसात हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये जोरदार बर्फवृष्टीचा अंदाज आहे. 19 आणि 20 जानेवारी रोजी पश्चिमी विक्षोभ सक्रिय झाल्यामुळे शिमलासह हिमाचल प्रदेशातील अनेक भागात बर्फवृष्टीची दाट शक्यता आहे. उत्तराखंडच्या चमोली आणि उत्तर काशीसारख्या ठिकाणीही पाऊस आणि हिमवृष्टी होण्याची शक्यता आहे. तर खालच्या मैदानी भागात धुक्याचा प्रभाव वाढणार आहे. राजस्थानमध्येही तीव्र थंडी आणि धुके जाणवत असल्यामुळे प्रशासनाने लहान मुलांसाठी शाळेच्या सुट्ट्या वाढवल्या आहेत. येत्या काही दिवसांत मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या काही भागात ढगाळ आकाश आणि हलक्या रिमझिम पावसाची शक्यता आहे.

उत्तर प्रदेशात अपघातांमध्ये 7 ठार

दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश, बिहार आणि झारखंडसह 12 राज्यांमध्ये तीव्र थंडी पडली. उत्तर प्रदेशात शनिवारी हंगामातील सर्वात दाट धुके पसरले. सध्या परिस्थिती इतकी बिकट झाली की रस्त्यांवर काहीही दिसत नव्हते. वाहनांचे दिवेही दिसत नसल्यामुळे अनेक अपघात झाले असून त्यात जीवितहानीही झाली आहे. मेरठ आणि बाराबंकीसह 15 जिह्यांमध्ये 40 हून अधिक वाहने एकमेकांवर आदळली. या अपघातांमध्ये दीड वर्षांच्या मुलीसह सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती शनिवारी सायंकाळी देण्यात आली. उत्तर प्रदेशातील 53 शहरे दाट धुक्याने वेढली गेल्यामुळे 10 जिह्यांमध्ये 35 वाहनांच्या टक्करी झाल्या.

Comments are closed.