आंतरराष्ट्रीय व्यापार दबावाखाली होत नाही.

सरसंघचालक मोहन भागवत यांचे महत्वपूर्ण विधान

वृत्तसंस्था / संभाजीनगर

‘आंतरराष्ट्रीय व्यापार करार दबाव टाकून केले जाऊ नयेत, असे विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले आहे. महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगर येथे एका हिंदू सम्मेलन कार्यक्रमात भाषण करताना त्यांनी या विषयावरील त्यांची मते व्यक्त केली आहेत. कोणत्याही देशाने कितीही व्यापार शुल्क लागू केले, तरी भारत आपल्या ‘आत्मनिर्भरते’च्या मार्गावर अग्रेसर होत राहील, असे ठाम प्रतिपादन मोहन भागवत यांनी या कार्यक्रमात शनिवारी केले.

भारत अनेक देशांना आपल्या वस्तूंची निर्यात करत आहे. तथापि, असे व्यवहार दबावात होत नसतात. कोणताही व्यापारी करार समतोल आणि उभयपक्षी लाभदायक असावा लागतो. काही देश जागतिकीकरण या संकल्पनेकडे केवळ जागतिक बाजारपेठ या दृष्टीकोनातून पहात आहेत. तथापि, भारत या संकल्पनेकडे ‘जागतिक कुटुंब’ या दृष्टीकोनातून पहात आहे. भारताने इतर देशांमध्ये रोजगार निर्मिती कशी होईल याचा विचार करु नये. भारतात तंत्रज्ञान कसे विकसीत होईल आणि आपला विदेशी आयातीवरचा भार कसा कमी होईल. याकडे भारताने लक्ष देण्याची प्राधान्याने आवश्यकता आहे, असेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले आहे.

केवळ हिंदू नाहीत उत्तरदायी

भारतात काहीही घडले तरी त्यासाठी केवळ हिंदू समाजाला उत्तरदायी मानण्याची प्रवृत्ती काही लोकांची आणि राजकीय पक्षांाची आहे. प्रत्येक भल्या-बुऱ्या घटनेनंतर हिंदू समाजालाच प्रश्न विचारले जातात. ही घातक प्रवृत्ती आहे. भारत ही केवळ एक भौगोलिक संकल्पना नाही. तर तो एक विचार, संस्कृती आणि इतिहास आहे. भारतावर अनेक शतकांपासून परकीय आक्रमणे, अत्याचार आणि हल्ले होत आहेत. तरीही अशी परचक्रे पचवून भारताने आपल्या परंपरांचे संरक्षण आणि संवर्धन केले आहे. भारताचे भवितव्य हे प्रामुख्याने हिंदू समाजाच्या हातीच आहे. त्यामुळे हिंदूंनी गुणवान, प्रामाणिक आणि चारित्र्यसंपन्न होण्याचा आणि राहण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. भारतातील हिंदू समाजाची गुणात्मक प्रगती झाली तर भारताची मान जगात उंचावणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना याच गुणवर्धनासाठी झाली आहे. हिंदू समाजाची एकात्मता हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ध्येय असले, तरी हे उत्तरदायित्व केवळ संघाचे आहे असे न मानता प्रत्येक हिंदूने या संदर्भात त्याचा भार उचलला पाहिजे. तसेच, हिंदू एकात्मतेचे महत्व पटवून घेणे हे साऱ्या हिंदू समाजाचे उत्तरदायित्व आहे, अशा अर्थाचे विचारही मोहन भागवत यांनी व्यक्त केले आहेत.

Comments are closed.