श्वानपूजेसाठी हजारो भाविक

आपल्या देशातील काही परंपरा आणि प्रथा अद्भूत आहेत, ही बाब सर्वज्ञात आहे. त्याचप्रमाणे काही घटनाही अशा घडतात, की त्यांचा तार्किक अर्थ लावणे कित्येकदा अशक्य ठरते. उत्तर प्रदेशातील बिजनौर येथेही अशीच एक घटना घडत आहे अणि ती पाहण्यासठी सहस्रावधी लोक प्रतिदिन जमत आहेत. या शहरात एक श्वान शहरातील देवी-देवतांच्या मंदिरांची परिक्रमा किंवा प्रदक्षिणा करत असलेला दिसून येतो. प्रथम त्याने हनुमान मंदिराची परिक्रमा केली. आता तो अन्य मंदिरांच्या परिक्रमा करताना दिसून येत आहे. काहीही न खातापिता हा श्वान मंदिरांची परिक्रमा करत असून त्याला पाहण्यासाठी भाविक गर्दी करतात.

हा श्वान प्रत्येक मंदिराची परिक्रमा न थांबता किंवा कोणतीही विश्रांती न घेता करीत आहे. तो चालून चालून धकला तर आपला एक-एक पाय वर घेऊन तो त्या पायाला काही काळ विश्रांती देतो. पण परिक्रमा थांबवत नाही. हा त्याचा उपक्रम गेले अनेक दिवस होत आहे, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. बिजनौर आणि आसपासच्या भागांमध्ये हा श्वान हा असंख्य लोकांच्या चर्चेचा विषय बनला असून त्याच्याविषयीचे कुतुहल लोक बोलून दाखवत आहेत. हा श्वान परिक्रमा करुन जणू या देव-देवतांची पूजाच करतो, अशी भाविकांची भावना आहे. अनेक भाविक या श्वानाला ‘भैरव बाबा’ मानून त्याच्यासमोर नतमस्तक होत आहेत. भाविक आता या श्वानाच्या योगक्षेमासाठी पुढे येताना दिसत आहेत. त्याचा आहार आणि दूध यांची व्यवस्था त्यांच्याकडून केली जात आहे. रात्री त्यांच्या विश्रांतीचीही व्यवस्था भाविकांनी स्वयंस्फूर्तीने केली आहे. स्थानिक लोक या श्वानाला ‘भक्त’ मानत असून त्याने मंदिरांच्या परिक्रमा करणे हा परमेश्वराचा चमत्कार आहे, असे मानत आहेत. तथापि, या श्वानाच्या मेंदूला आजार झाला असून त्यामुळे तो एकाच दिशेने फिरत राहतो, असे काही तज्ञांचे मत आहे.

Comments are closed.