IND vs NZ: गोलंदाजांनी सढळ हाताने लुटवल्या धावा, शुबमन गिलचे नेतृत्व फेल; इंदोर वनडेमध्येही भारताची तीच कमजोरी समोर!

वडोदरा, राजकोट आणि आता इंदोर वनडेमध्ये भारतीय संघाची एक जुनी कमजोरी कायम राहिली. न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात न्यूझीलंडने 8 गडी गमावून 337 धावांचा डोंगर उभा केला. सुरुवातीला केवळ 5 धावांवर 2 विकेट्स गमावून संकटात सापडलेल्या किवी संघाला भारतीय गोलंदाजांनी पुन्हा एकदा पुनरागमन करण्याची संधी दिली. या सामन्यात शुबमन गिलचं नेतृत्व अत्यंत साधारण दर्जाचं वाटलं, तर गोलंदाजांनीही सढळ हाताने धावा दिल्या.

टॉस जिंकल्यानंतर कर्णधार शुबमन गिलने न्यूझीलंडला प्रथम फलंदाजी दिली. अर्शदीप सिंगने पहिल्याच षटकांमध्ये हेन्री निकोल्सला बाद केले, तर दुसऱ्या षटकांमध्ये हर्षित राणाने डेव्हन कॉनवेला तंबूत धाडले. 58 धावांपर्यंत पोहोचता पोहोचता न्यूझीलंडने विल यंगचीही विकेट गमावली. किवी संघ पूर्णपणे दबावाखाली होता आणि भारताने सामन्यावर पकड मिळवली होती. मात्र, यानंतर भारतीय गोलंदाजांना चौथी विकेट मिळवण्यासाठी थेट 219 धावांपर्यंत वाट पाहावी लागली.

मधल्या षटकांमध्ये (Middle Overs) विकेट न मिळण्याची कमजोरी पुन्हा एकदा समोर आली. डॅरिल मिचेल (Daryl Mitchell & glenn Philips) आणि ग्लेन फिलिप्ससमोर भारतीय गोलंदाजांनी जणू शरणागतीच पत्करली होती. वडोदरा आणि राजकोटमध्ये त्याच चुका करूनही इंदोरमध्ये भारतीय गोलंदाज सुधारणा करून मैदानात उतरले नाहीत, असेच चित्र दिसले.

कर्णधार शुबमन गिलला ही मोठी भागीदारी तोडण्यासाठी 31 षटकांपर्यंत कोणताही प्लॅन आखता आला नाही. विकेट तर मिळत नव्हतीच, पण धावांवर लगाम लावण्यातही गोलंदाज अपयशी ठरले. अर्शदीपने 10 षटकांमध्ये 63 धावा दिल्या, तर हर्षितने 84 धावा खर्च केल्या. कुलदीप यादवने केवळ 6 षटके टाकली आणि त्यात त्याने 48 धावा दिल्या. विशेष म्हणजे, रवींद्र जडेजाला त्याचे पहिले षटक टाकण्यासाठी तब्बल 29 षटके वाट पाहावी लागली.

मिडल ओव्हर्समध्ये विकेट्स न मिळणे ही कमजोरी भारतीय संघासाठी मोठी अडचण ठरू शकते. मायदेशात जर भारतीय गोलंदाजांची आणि विशेषत फिरकीपटूंची ही अवस्था असेल, तर परदेशात टीम इंडिया कशी जिंकणार? हा मोठा प्रश्न आहे. 2027 च्या वर्ल्ड कपपूर्वी या समस्येवर लवकरात लवकर तोडगा काढणे भारतासाठी अत्यंत आवश्यक आहे.

Comments are closed.