न्यूझीलंडने किल्ला सर केला; 38 वर्षांत प्रथमच भारताविरुद्ध वनडे मालिका जिंकली
न्यूझीलंड क्रिकेट संघाने रविवारी इंदोर येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या आणि निर्णायक वनडे सामन्यात भारतावर 41 धावांनी विजय मिळवत इतिहास रचला. या विजयासह न्यूझीलंडने तब्बल 38 वर्षांनंतर भारतीय भूमीवर वनडे मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. होळकर स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात पाहुण्या संघाने प्रथम फलंदाजी करत 50 षटकांत 8 विकेट्स गमावत 337 धावांचा भक्कम डोंगर उभारला.
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. सुरुवातीला हा निर्णय योग्य ठरत भारतीय वेगवान गोलंदाजांनी न्यूझीलंडला मोठा धक्का दिला. अवघ्या 58 धावांत पाहुण्या संघाचे तीन विकेट्स बाद झाले होते. अर्शदीप सिंग आणि हर्षित राणा यांनी अचूक टप्प्यावर मारा करत न्यूझीलंडच्या फलंदाजांना अडचणीत टाकले. मात्र त्यानंतर डॅरिल मिचेल आणि ग्लेन फिलिप्स यांनी संयमी आणि आक्रमक फलंदाजीचे मिश्रण करत सामन्याचे चित्र बदलले.
मिचेल आणि फिलिप्स यांच्यात चौथ्या विकेटसाठी 219 धावांची जबरदस्त भागीदारी झाली. दोघांनीही शतकी खेळी साकारत भारताच्या गोलंदाजीवर वर्चस्व गाजवले. मिचेलने सलग दुसरे शतक झळकावत आपला उत्तम फॉर्म कायम राखला, तर फिलिप्सनेही आक्रमक फटकेबाजी करत भारताला पिछाडीवर टाकले. शेवटच्या षटकांत भारताने काही विकेट्स घेतल्या, मात्र न्यूझीलंडला 337 धावांपर्यंत मजल मारण्यापासून रोखू शकले नाही.
338 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात निराशाजनक ठरली. अवघ्या 13 षटकांत भारताने रोहित शर्मा, शुभमन गिल, श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांचे विकेट्स गमावले. त्यानंतर विराट कोहली आणि नीतिश कुमार रेड्डी यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. दोघांमध्ये पाचव्या विकेटसाठी 88 धावांची भागीदारी झाली. रेड्डीने 53 धावांची धडाकेबाज खेळी केली.
विराट कोहलीने संयमी खेळी करत आपले शतक पूर्ण केले आणि एकाकी झुंज दिली. मात्र आवश्यक धावगती वाढत गेल्याने दबाव वाढला. कोहली बाद झाल्यानंतर भारताचा डाव 296 धावांत संपुष्टात आला. हर्षित राणाने अखेरच्या टप्प्यात झटपट अर्धशतक झळकावले, पण तोपर्यंत सामना न्यूझीलंडच्या बाजूने झुकला होता.
Comments are closed.