विराट कोहलीच्या झुंजार शतकानंतरही पराभव; हिंदुस्थानचा 41 धावांनी पराभव, न्यूझीलंडने प्रथमच एकदिवसीय मालिका जिंकली

होळकर स्टेडियमवर रंगलेल्या निर्णायक सामन्यात झुंजार लढत देऊनही अखेर हिंदुस्थानला नामोहरम व्हावं लागलं. तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसऱया आणि निर्णायक लढतीत न्यूझीलंडने हिंदुस्थानचा 41 धावांनी पराभव करत मालिका 2-1 अशी जिंकली आणि पहिल्यांदाच हिंदुस्थानी भूमीवर वन डे मालिका जिंकण्याचा इतिहास रचला. 338 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हिंदुस्थानचा डाव 46 षटकांत 296 धावांत आटोपला. याने झुंजार शतक झळकावले, पण ही खेळीही पराभव टाळण्यासाठी अपुरी ठरली.

मोठय़ा लक्ष्याचा पाठलाग करताना हिंदुस्थानची सुरुवातच ढासळलेली झाली. रोहित शर्मा केवळ 11 धावांवर माघारी परतला, तर कर्णधार शुभमन गिल 23 धावांवर बाद झाला. श्रेयस अय्यरला खातेही उघडता आले नाही आणि के. एल. राहुलही पूर्णपणे अपयशी ठरला. अवघ्या 71 धावांत चार फलंदाज तंबूत परतल्याने हिंदुस्थानवर सामन्याच्या सुरुवातीलाच प्रचंड दडपण आले.

या संकटातून हिंदुस्थानला सावरण्याचा प्रयत्न विराट कोहली आणि नीतिश कुमार रेड्डी यांनी केला. पाचव्या विकेटसाठी दोघांनी 88 धावांची महत्त्वाची भागीदारी रचली. कोहलीने आक्रमक शैलीत अर्धशतक पूर्ण केलं, तर नीतिशनेही अर्धशतक झळकावून आशा पल्लवित केल्या. मात्र, नीतिश 53 धावांवर बाद झाला आणि त्यानंतर रवींद्र जाडेजाही मोठी खेळी न करता बाद झाला.

मग पुन्हा एकदा कोहलीने एकाकी झुंज दिली. सातव्या विकेटसाठी त्याने हर्षित राणासोबत 99 धावांची झुंजार भागीदारी उभी केली. कोहलीने 91 चेंडूंमध्ये आपले शतक पूर्ण केले. हे त्याच्या एकदिवसीय कारकीर्दीतील 54 वे आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 85 वे शतक ठरले. आठ चौकार आणि दोन षटकारांनी सजलेली ही खेळी प्रेक्षकांना उभे राहून टाळय़ा वाजवायला लावणारी होती, मात्र हर्षित राणा बाद होताच हिंदुस्थानच्या उरलेल्या आशाही कोसळल्या. पुढच्याच चेंडूवर मोहम्मद सिराजही तंबूत परतला आणि सामना न्यूझीलंडच्या बाजूने झुकला.

याआधी टॉस हरल्यानंतर फलंदाजी करताना न्यूझीलंडची सुरुवातही खराब झाली होती. अवघ्या सहा धावांत दोन विकेट्स गेल्या होत्या. मात्र त्यानंतर डेरिल मिचेल आणि विल यंग यांनी डाव सावरला. यंग बाद झाल्यानंतर मैदानावर जे घडले, त्याने सामन्याचं चित्रच पालटलं. डेरिल मिचेल आणि ग्लेन फिलिप्स यांनी चौथ्या विकेटसाठी तब्बल 219 धावांची ऐतिहासिक भागीदारी करत हिंदुस्थानला पूर्णपणे बॅकफूटवर ढकलले. मिचेलने 137 धावांची दमदार खेळी केली, तर फिलिप्सने 106 धावांचं शतक झळकावले. अखेरच्या षटकांत कर्णधार मायकेल ब्रेसवेलने झटपट धावा जोडत न्यूझीलंडला 337 धावांपर्यंत नेले. हिंदुस्थानकडून अर्शदीप सिंग आणि हर्षित राणा यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या.

वडोदऱयातील पहिला सामना हिंदुस्थानने जिंकला होता, राजकोटमध्ये न्यूझीलंडने बरोबरी साधली आणि इंदूरमध्ये निर्णायक विजय मिळवत कीवी संघाने मालिका आपल्या नावावर केली. एकूणच, कोहलीची झुंजार शतकी खेळीही पराभव रोखू शकली नाही आणि इंदूरच्या मैदानावर न्यूझीलंडने इतिहास घडवत हिंदुस्थानला जबर धक्का दिला.

Comments are closed.