आरे स्टॉलधारकाकडून अतिरिक्त भुईभाडे आकारू नका, महाराष्ट्र दूध वितरक सेनेची मागणी

शासनाच्या ताब्यात असलेल्या आरे स्टॉलचे अतिरिक्त भुईभाडे केंद्रधारकाकडून वसूल करू नका, अशी मागणी महाराष्ट्र दूध वितरक सेनेतर्फे बृहन्मुंबई दूध योजनेचे आयुक्त आणि महाव्यवस्थापकांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

बृहन्मुंबई दूध योजनेचे महाव्यवस्थापक यांच्या परिपत्रकानुसार, 15 टक्के अधिभारासह प्रतिकेंद्र 2024-25 करिता फक्त सकाळ स्टॉलसाठी प्रतिवर्ष 4928 रुपये, दूध- एनर्जी व पूर्णवेळ एनर्जी स्टॉलसाठी प्रतिवर्ष 9473 रुपये तसेच आरे सरिता स्टॉलसाठी प्रतिवर्ष 48,880 रुपये भुईभाडे भरणा करावा. परंतु शासनाच्या ताब्यात असलेल्या स्टॉलबाबत केंद्रधारकाचा कोणताही संबंध नाही. त्यामुळे सदर अधिभाराबाबत शासनाने तजवीज करावी, अशी मागणी महाराष्ट्र दूध वितरक सेनेने केली आहे.

नियमानुसार दूध केंद्राचे वाटप करा

2022 साली तत्कालीन सरकारने मुंबईकरांकडून अर्ज मागविले होते. त्यासाठी अंदाजे 400 ते 500 अर्ज प्राप्त झाले होते, मात्र आजपर्यंत या स्टॉलचे वाटप झालेले नाही. वाटप झाल्यास सध्या कार्यरत असलेल्या स्टॉल चालकाकडून 15 टक्के भुईभाडे अधिकार भरणा करण्याचा प्रश्नच येणार नाही. या अर्जाचे नियमानुसार वाटप केल्यास केंद्र चालकाचे नुकसान होणार नाही, असे महाराष्ट्र दूध वितरक सेनेचे कार्याध्यक्ष राम कदम यांनी सांगितले.

…अन्यथा आंदोलन करू

सध्या आरे दूध आणि दुग्धजन्य पदार्थ तसेच आरे सह उत्पादने आरे केंद्रावरून विक्रीकरिता उपलब्ध नसल्यामुळे आरे केंद्रधारक आर्थिक अडचणीत आहे. याबाबत संबंधित मंत्री, सचिव, दुग्ध व्यवसाय विभाग आयुक्त तसेच बृहन्मुंबई दूध योजना व्यवस्थापक यांच्याशी वारंवार पत्रव्यवहार करण्यात आला आहे, परंतु अद्याप योग्य तो प्रतिसाद मिळालेला नाही. याबाबत तातडीने योग्य तो निर्णय घ्यावा अन्यथा आंदोलन करावे लागेल, अशा इशारा संघटनेने दिला आहे.

Comments are closed.