मला नोकरीची गरज नाही मी गंमत म्हणून…; इंदापूर भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकाऱ्याचा मुजोरपणा,

इंदापूर: इंदापूर येथील भूमी अभिलेख कार्यालयातील एका अधिकाऱ्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. संबंधित अधिकारी पुढील व्यक्तीसोबत अरेरावीची, अवमानकारक आणि वादग्रस्त भाषा वापरताना कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये अधिकारी स्वतःची आर्थिक व सामाजिक ताकद सांगत दबाव टाकताना दिसत आहेत. माझ्याकडे भरपूर जमीन आहे. मी खानदानी मोठा आहे. पैसा पाण्याने भरपूर आहे. दहा-वीस लाख रुपये टाकून मोकळा होतो” अशा प्रकारची वक्तव्ये करत ते आपली संपत्ती आणि पैशांची ताकद मिरवत असल्याचे ऐकू येते.

तसेच 75 एकर बागायत जमीन आहे…ऊस, बागायत सगळं आहे… मी पगारी नोकरीसाठी काम करत नाही, हौसेने काम करतो.. याचबरोबर माझ्या बापाला पावणेदोन लाख रुपये पेन्शन आहे… साहेबांना कॉन्टॅक्ट केला म्हणजे आम्ही घाबरत नाही… माझ्या विरोधात काय करायचं ते करा अशा धमकीवजा वक्तव्यांमुळे शासकीय अधिकाऱ्यांच्या वर्तनावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या संपूर्ण प्रकारामुळे भूमी अभिलेख कार्यालयातील कामकाजाची पद्धत, अधिकाऱ्यांची भाषा आणि सामान्य नागरिकांशी होणारी वागणूक यावर तीव्र नाराजी व्यक्त केली जात असून, संबंधित अधिकाऱ्यावर वरिष्ठ पातळीवरून चौकशी व कारवाई होते का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

व्हिडीओमध्ये नेमकं काय आहे?

इंदापूर येथील भूमी अभिलेख कार्यालयातील एका अधिकाऱ्याचा हा व्हिडिओ आहे. ते व्हिडीओमध्ये संबंधित व्यक्तीला म्हणतात, मी गंमत म्हणून काम करतो आहे, माझी घरी सतरा एकर केळी आणि सतरा एकर उस आहे, डायरेक्ट साहेबांना भेटलं म्हणून काम होत नाहीत. आलं का लक्षात, आतमध्ये भेटा आणि काय झालं ते विचारा. साहेबाला पाठवलं किंवा कुठे पाठवलं तर मी घाबरणारा नाहीये, मी पळसदेवचा आहे, मला नोकरीची गरज नाही. तुम्हाला एक सांगतो, माझी घरी सतरा एकर केळी आणि सतरा एकर उस आहे, मी इथे,  मी एकुलता एक आहे, तसंल करू नका साहेबाला पाठव आणि बाकी काय ते, तुम्ही मला पाठवायचं ना ते त्यांना कशाला पाठवला, तुम्ही कशाला येता मग तुम्हाला नंबर देतो फोन करून या,मी एक तारखेला हजर झालेय त्या आधीची माहिती माझ्याकडे नाहीये, साहेबांना फोन केला म्हणजे आम्ही घाबरतो असं नाही, आम्ही त्यांना घाबरत नाही, तुम्ही प्रेमाने बोलला असता तर कपडे देखील काढून देईल पण, तुम्ही सरळ साहेबांना फोन केला, मी सर्वांना पुरून उरतो आहे, मी खानदाणी आहे, असं म्हणत या अधिकाऱ्याने संबंधित व्यक्तीला धमकीवजा इशारा दिल्याने नागरिकांनी पुन्हा एकदा संताप व्यक्त केला आहे. या व्हिडीओतील अधिकाऱ्याचे नाव किंवा बाकी कोणतीही माहिती मिळू शकली नाही, पण त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.

आणखी वाचा

Comments are closed.