वडिलांच्या निधनानंतर अवघ्या 15 दिवसांत कुटुंबावर दुसरा आघात, 21 वर्षीय मुलानं विहिरीत उडी मारून

नाशिक क्राईम न्यूज : सिडको परिसरातील दत्त चौक, लक्ष्मीनगर, महाले फार्म भागात राहणाऱ्या 21 वर्षीय शुभम बाळासाहेब व्यापारी (Shubham Vyapari) या तरुणाने खांडे मळा परिसरातील एका विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे वडिलांच्या अपघाती निधनानंतर अवघ्या पंधरा दिवसांतच व्यापारी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात (Ambad Police Station) आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अंबड पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुभमचे वडील बाळासाहेब व्यापारी हे फळव्यवसाय करत होते. पंधरा दिवसांपूर्वी एका अपघातात त्यांचे आकस्मिक निधन झाले होते. वडिलांच्या निधनानंतर कुटुंबीयांनी दहावा व तेरावा असे धार्मिक विधी पार पाडले होते. त्यानंतर अवघ्या दोन दिवसांत 15 जानेवारी रोजी मतदानाचा दिवस असल्याने अनेक नातेवाईक आपापल्या कामानिमित्त बाहेर गेले होते.

Nashik Crime News: विहिरीत आढळला तरुणाचा मृतदेह

याच दरम्यान शुभम घरातून अचानक बेपत्ता झाला. त्याचा शोध घेण्यासाठी कुटुंबीयांनी मित्र, नातेवाईक तसेच संभाव्य ठिकाणी कसून शोधमोहीम राबवली. मात्र, चार दिवस उलटूनही शुभमचा कोणताही मागमूस लागला नाही. अखेर रविवार (दि. 19) रोजी सकाळच्या सुमारास सिडकोतील खांडे मळा परिसरातील एका विहिरीत तरुणाचा मृतदेह तरंगताना नागरिकांच्या निदर्शनास आला.

Nashik Crime News: आत्महत्येचे कारण अस्पष्ट

नागरिकांनी तत्काळ अंबड पोलीस ठाण्याला माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. त्यानंतर नातेवाइकांना बोलावून मृतदेहाची ओळख पटवण्यात आली. मृतदेह शुभम व्यापारी याचाच असल्याची खात्री झाल्यानंतर तो शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. दरम्यान, शुभमने आत्महत्या का केली, यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. वडिलांच्या निधनानंतर तो मानसिक तणावात होता का, याचा तपास पोलीस करत आहेत. या घटनेमुळे व्यापारी कुटुंबावर कोसळलेल्या दुःखाने नागरिकही भावुक झाले असून, परिसरात शोककळा पसरली आहे. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास अंबड पोलीस करीत आहेत.

इतर महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime News: आय लव्ह यू मॉम-डॅड…; दिव्यांग तरुणीने शेवटची भावना तळहातावर लिहिली, गळ्याला दोर लावत जीवनयात्रा संपवली, घटनेनं नाशिक हादरलं!

Sanjay Raut on Girish Mahajan: भाजपचा उमेदवार मुसलमानांमुळे निवडून आला, गिरीश महाजन-राहुल ढिकलेंचा ‘तो’ व्हिडिओ पोस्ट करत संजय राऊतांनी डिवचलं; म्हणाले…

आणखी वाचा

Comments are closed.