Healthy Habbits: पन्नाशीनंतर पाळा ‘या’ आरोग्यदायी सवयी; राहाल फिट अँड फाईन
वयाची पन्नाशी ओलांडली की शरीरात अनेक नैसर्गिक बदल होऊ लागतात. पचनशक्ती मंदावते, हाडे आणि स्नायू कमकुवत होतात, विविध प्रकारच्या व्याधी जडण्याची शक्यता असते. मात्र, जर तुम्ही तुमच्या जीवनशैलीत थोडे बदल केले, तर पन्नाशीनंतरही तुम्ही विशी-तिशीसारखे उत्साही आणि फिट राहू शकता. ( Healthy Habbits To Follow After age 50 )
हार्वर्ड मेडिकल स्कूल आणि हार्वर्ड टी.एच. चॅन स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ यांनी केलेल्या अभ्यासात असे आढळून आले आहे की पन्नाशीनंतर काही निरोगी सवयी पाळणाऱ्या लोकांना आजार होण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे उतारवयात तुम्ही सुद्धा त्या सवयी नक्की पाळायला हव्यात…
व्यायाम
पन्नाशीनंतर शारीरिकदृष्ट्या सक्रिय असणे गरजेचे आहे. त्यामुळे नियमितपणे व्यायाम करावा. यामुळे वजन नियंत्रित राहते, दिवसभर ऊर्जा मिळते, शरीर सक्रिय राहते आणि पचनक्रियाही सुधारते. लक्षात ठेवा जड व्यायाम करण्याची गरज नाही. तुम्ही सूर्यनमस्कार, वॉकिंग, सायकलिंग केल्यास फायदा होतो. याशिवाय योगा केल्याने तुमचे मानसिक आरोग्यही चांगले राहते.
वजन नियंत्रणात ठेवा
जर तुमचे वजन जास्त असेल तर तुम्हाला वयानुसार विविध आजारांचा धोका असू शकतो. हृदयरोग, उच्च रक्तदाब, मधुमेह, किडनीस्टोन, श्वसनाच्या समस्या आणि कर्करोगाचा धोका वाढतो. म्हणून पन्नशीनंतर प्रत्येकाने वजन नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न करावा.
आहार
आपण जे खातो त्याचाच आपल्या आरोग्यावर थेट परिणाम होतो. रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्र (CDC) नुसार, अमेरिकेत हृदयरोगामुळे चारपैकी एकाचा मृत्यू होतो. तर लठ्ठपणा, उच्च कोलेस्ट्रॉल, उच्च रक्तदाब आणि असंतुलित आहार ही अकाली मृत्यूची मुख्य कारणे ठरत आहेत. पन्नाशीनंतर शरीराची ऊर्जेची गरज कमी होते, पण शरीराला पोषण हवे असते. त्यामुळे पौष्टिक पदार्थ आहारात समाविष्ट करा. जास्त साखर, मीठ, तळलेले आणि मसालेदार पदार्थ टाळा. घरी बनवलेले ताजे अन्न, फळे, भाज्या घ्या.
तपासणी
सर्वात महत्त्वाची सवय म्हणजे आरोग्य तपासणी. उतारवयात नियमितपणे आरोग्य तपासणी करणे गरजेचे आहे. यात प्रामुख्याने रक्तदाब, शुगर, कोलेस्ट्रॉल, डोळ्यांची तपासणी करावी. यामुळे शरीरात झालेले बदल, कमतरता लक्षात येतात आणि वेळीच त्यावर उपचार घेण्यासाठी मदत होते.
मानसिक आरोग्य जपा
शारीरिक आरोग्याइतकेच मानसिक आरोग्यही महत्त्वाचे आहे. निवृत्तीनंतर किंवा मुलांच्या जबाबदाऱ्या पार पाडल्यानंतर एकाकीपणा जाणवू शकतो. यामुळे छंद जोपासा, मित्रांशी संवाद साधा, ध्यान करा. तसेच धूम्रपान आणि मद्यपानसारख्या सवयी तुमच्या यकृत आणि फुफ्फुसांसाठी घातक ठरू शकतात. त्यामुळे वेळीच या सवयी सोडा.
झोप आणि पाणी
पन्नाशीनंतर अनेकांना निद्रानाशाचा त्रास होतो. मात्र शरीरासाठी ७-८ तासांची शांत झोप आवश्यक आहे. झोपण्यापूर्वी स्क्रीन टाइम कमी करा. तसेच दिवसातून किमान ८-१० ग्लास पाणी पिण्याची खात्री करा. यामुळे किडनीचे कार्य सुधारते.
Comments are closed.