20 वर्षांत फक्त एकदाच सेमीफायनल! वर्ल्डकपमध्ये बांगलादेशची कामगिरी अतिशय सुमार; जाणून घ्या आकडेवारी
भारतात होणाऱ्या टी-20 वर्ल्डकपमध्ये बांगलादेशच्या सहभागाबाबत मोठी अनिश्चितता निर्माण झाली आहे (ICC T20 international world cup 2026). बांगलादेशातील हिंदू धर्मीयांवरील हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर भारतात निदर्शने झाली, ज्याचा परिणाम म्हणून बीसीसीआयने मुस्ताफिझूर रहमानला आयपीएलमधून रिलीज करण्याचे आदेश दिले. याला प्रत्युत्तर म्हणून बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) तेथे आयपीएल प्रसारणावर बंदी घातली आणि सुरक्षिततेचे कारण देत आपले सामने भारताबाहेर हलवण्याची किंवा गट बदलण्याची मागणी आयसीसीकडे केली.
बांगलादेशने श्रीलंकेत सामने खेळवण्याचा किंवा आयर्लंडशी जागा बदलण्याचा प्रस्ताव दिला होता, परंतु आयसीसीने ऐनवेळी वेळापत्रकात बदल करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. आयसीसीच्या सुरक्षा समितीने भारतातील परिस्थिती खेळण्यासाठी योग्य असल्याचे सांगितले असले तरी बांगलादेश आपल्या भूमिकेवर ठाम आहे. या वादावर 21 जानेवारी रोजी अंतिम निर्णय होण्याची शक्यता असून, बांगलादेशने नकार कायम ठेवल्यास त्यांच्या जागी स्कॉटलंडला वर्ल्डकपमध्ये प्रवेश मिळू शकतो.
बांगलादेशच्या आजवरच्या प्रवासाचा विचार केल्यास आयसीसी स्पर्धांमध्ये त्यांना फारसे यश मिळालेले नाही.
वनडे वर्ल्डकपमध्ये 2007 मध्ये भारताला हरवणे आणि 2015 मध्ये उपउपांत्य फेरी गाठणे, ही त्यांची मोठी कामगिरी आहे. टी-20 वर्ल्डकपमध्येही त्यांना अनेकदा प्राथमिक फेरीतच गाशा गुंडाळावा लागला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी 2017 मध्ये त्यांनी उपांत्य फेरी गाठून सर्वांना चकित केले होते, मात्र वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये हा संघ सातत्याने तळाच्या क्रमांकावर राहिला आहे.
Comments are closed.