आता नबीन माझा बॉस आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून भलावण : पंचेचाळीस वर्षांचे नितीन नबीन भाजपचे आजवरचे सर्वात तरुण अध्यक्ष

► वृत्तसंस्था / नवी दिल्ली

भारतीय जनता पक्षाचे नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी पदभार स्वीकारला आहे. सोमवारी ते या महत्त्वाच्या पदावर निर्विरोध निवडून आले आहेत. मंगळवारी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या येथील मुख्यालयात पक्षाची सूत्रे हाती घेतली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नबीन यांचे अभिनंदन केले.

नितीन नबीन हे बिहारचे असून ते 45 वर्षांचे आहेत. ते भारतीय जनता पक्षाचे आतापर्यंतचे सर्वात तरुण अध्यक्ष आहेत. कुशल संघटक म्हणून त्यांचा नावलौकीक आहे. भारतीय जनता पक्षाने त्यांना हे पद दिल्याने पक्ष आता संघटनाबांधणीकडे अधिक लक्ष पुरविणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच पक्षाच्या संचालनात आता तरुण रक्ताला अधिक प्राधान्य दिले जाईल, याचे संकेतही त्यांच्या निवडीतून प्राप्त होत आहेत. ते पक्षाचे 12 वे अध्यक्ष आहेत.

मोठी आव्हाने समोर

नितीन नबीन यांच्यासमोर आता मोठी आव्हाने उभी आहेत. येत्या तीन महिन्यांमध्ये पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू आणि केरळ ही चार राज्ये आणि पुदुच्चेरी हा केंद्रशासित प्रदेश येथे विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांमध्ये पक्षाची कामगिरी कशी चांगली होईल, हे पाहण्याचे उत्तरदायित्व नबीन यांचे आहे. त्यांची या पदावर नियुक्ती 3 वर्षांसाठी करण्यात आली आहे.

कोण आहेत नितीन नबीन

नितीन नबीन यांची भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निर्विरोध निवड झाली आहे. त्यांच्या विरोधात कोणीही आवेदन पत्र सादर केले नव्हते. त्यामुळे सोमवारीच त्यांची निर्विरोध निवड झाल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. बिहारमधील भारतीय जनता पक्षाचे दिवंगत नेते नबीन किशोर प्रसाद सिन्हा यांचे ते पुत्र आहेत. त्यांचे पिता चारवेळा बिहार विधानसभेचे सदस्य होते. 2006 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर नितीन नबीन यांनी राजकारणात प्रवेश केला. अध्यक्ष होण्यापूर्वी ते मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वातील बिहार सरकारमध्ये मार्ग बांधणी आणि नगर विकास विभागाचे मंत्री होते. पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आल्यानंतर त्यांनी मंत्रिपदाचा त्याग करून हे पद स्वीकारले.

दोन दशकांचा अनुभव

नबीन हे गेली 20 वर्षे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून राजकारणात आहेत. ते नेहमी ‘पक्ष प्रथम’ या भूमिकेत असतात, अशी त्यांची ख्याती आहे. राजकारणाचा प्रारंभ त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या बिहार युवक शाखेचा कार्यकर्ता म्हणून केला. काही राज्यांमध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षाचे निवडणूक प्रभारी म्हणून यशस्वी कामगिरी करुन दाखविली होती. भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षपदी झालेली त्यांची निवड ही अनेकांसाठी आश्चर्यकारक मानली गेली. जेव्हा भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षपदासाठी प्रसारमाध्यमांमध्ये जोरात चर्चा होत होती, त्यावेळी त्यांचे नाव केव्हाही चर्चेत आले नव्हते. तथापि, अखेर त्यांचीच या पदासाठी निवड करण्यात आली, तेव्हा तोही व्यापक चर्चेचा विषय बनला होता.

आता तुम्ही माझे ‘बॉस’

‘मी जरी देशाचा नेता असलो, तरी भारतीय जनता पक्षाचा केवळ एक कार्यकर्ता आहे. त्यामुळे पक्षकार्याच्या दृष्टीने आता नितीन नबीन हे माझे प्रमुख आहेत. त्यांच्या नेतृत्वात मी पक्षकार्य करणार आहे, अशा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नितीन नबीन यांचा गौरव केला आहे. या पदावर निवड झाल्यानंतर त्यांनी त्यांचे अभिनंदन केले. प्रशासन आणि पक्ष यांच्यात ते उत्तम समन्वय राखतील. ते अनुभवी नेते आणि कुशल संघटक आहेत. त्यांच्या संघटनाकौशल्याचा पक्षाला निश्चित लाभ होईल, अशी त्यांची भलावण होत आहे.

नबीन यांनी स्वीकारला पदभार

ड एक वर्षाहून अधिक काळच्या प्रतीक्षेनंतर पक्षाला मिळाला राष्ट्रीय अध्यक्ष

ड नितीन नबीन यांची या पदावर झाली आहे तीन वर्षांसाठी निर्विरोध निवड

ड भाजपची सूत्रे आता तरुणांच्या हाती जाण्याची नांदी असल्याची प्रतिक्रिया

Comments are closed.