Anil Galgali On Mumbai Mayor :मुंबई महापौर पदासाठी 114 चा ‘जादुई आकडा’ आवश्यक नाही, वस्तुस्थिती काय?

Anil Galgali On Mumbai Mayor :मुंबई महापौर पदासाठी 114 चा ‘जादुई आकडा’ आवश्यक नाही, वस्तुस्थिती काय?

मुंबई महानगरपालिका निवडणूक निकाल 2026 जाहीर झाल्यानंतर आता महापौर कोण होणार याची उत्सुकता आहे. मुंबई मनपाच्या निकालात 89 जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर उद्धव ठाकरेंची शिवसेना 65 जागांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. महायुतीतील एकनाथ शिंदे शिवसेना 29 जागांसह तिसऱ्या स्थानावर गेली आहे. मुंबई महानगपालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी 114 ची मॅजिक फिगर आहे. मात्र मुंबई महापौर पदासाठी 114 चा ‘जादुई आकडा’ आवश्यक नसल्याचं मत माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली (Anil Galgali) यांनी व्यक्त केलं आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांनंतर दरवेळी एक ठरावीक चर्चा हमखास रंगते की “महापौर होण्यासाठी 114 नगरसेवक हवेत”. मात्र ही समजूत अर्धवट माहितीवर आधारित असून वस्तुस्थितीशी विसंगत आहे. कायदेशीर आणि घटनात्मकदृष्ट्या पाहता, मुंबई महापौर पदासाठी 114 चा आकडा बंधनकारक नाही, असं माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली म्हणाले. बृहन्मुंबई महानगरपालिकेत एकूण 227 नगरसेवक असतात. त्यातील निम्म्यापेक्षा एक अधिक म्हणजे 114 हा आकडा बहुमतासाठी महत्त्वाचा मानला जातो. मात्र महापौर निवडणूक ही पूर्ण सभागृहाच्या बहुमतावर नव्हे, तर उपस्थित व मतदान करणाऱ्या नगरसेवकांवर अवलंबून असते. मुंबई महानगरपालिका अधिनियमानुसार महापौराची निवड ही महापालिकेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत होते. सभेसाठी आवश्यक तेवढा कोरम पूर्ण असणे गरजेचे असते. उपस्थित आणि मतदान करणाऱ्या नगरसेवकांपैकी ज्याला अधिक मते मिळतात, तो महापौर निवडला जातो. याचा स्पष्ट अर्थ असा की 227 पैकी 114 मते मिळायलाच हव्यात, अशी कोणतीही कायदेशीर अट नाही, अशी माहितीही अनिल गलगली यांनी दिली.

Comments are closed.