‘धुरंधर 2’मध्ये ‘उरी’ स्टारची एंट्री, रणवीरसोबत विक्की कौशल दिसणार? घ्या जाणून – Tezzbuzz

धुरंधर 2 संदर्भातील चर्चांना सध्या जबरदस्त वेग आला आहे. चित्रपटात सतत मोठी नावं जोडली जात असल्याने प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. सिक्वेलबाबत आधीच प्रचंड क्रेझ होता, पण आता समोर येणाऱ्या नव्या माहितीनं फॅन्सची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अक्षय खन्ना फ्लॅशबॅक सीक्वेन्समधून पुनरागमन करणार असल्याचं जवळपास निश्चित मानलं जात आहे. अशातच ताज्या रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात येतोय की विक्की कौशल देखील या पॉवर-पॅक्ड फ्रँचायझीचा भाग झाला आहे. ही बातमी खरी ठरली, तर ‘धुरंधर’ युनिव्हर्स आणखी विस्तारलेलं पाहायला मिळू शकतं.

विकी कौशलचा (Vicky Kaushal)रोल केवळ कॅमिओपुरता मर्यादित नसेल, असं सूत्रांकडून सांगितलं जात आहे. इंडस्ट्रीतील चर्चांनुसार, विक्की पुन्हा एकदा मेजर विहान शेरगिल या आपल्या लोकप्रिय भूमिकेत दिसू शकतो. हीच भूमिका त्याने आदित्य धर दिग्दर्शित 2019 मधील सुपरहिट चित्रपट ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’ मध्ये साकारली होती. आजही हे पात्र प्रेक्षकांच्या स्मरणात ताजं आहे आणि त्याच्या पुनरागमनाच्या चर्चांनी सोशल मीडियावर खळबळ उडवली आहे.

मिडिया रिपोर्टनुसार, दिग्दर्शक आदित्य धर सध्या धुरंधर 2 मधील सगळे मोठे सरप्राइझ गुप्त ठेवू इच्छित आहेत. मात्र त्यांनी ‘उरी’ आणि ‘धुरंधर’ या दोन्ही कथांना एका युनिव्हर्समध्ये जोडण्याचा प्रयत्न केल्याचं सांगितलं जात आहे. ‘उरी’ची कथा 2016 च्या घटनांवर आधारित होती आणि त्याच टाइमलाइनमधून विक्कीचं पात्र धुरंधर 2 मध्ये दाखवण्यात येऊ शकतं. विक्की कौशल आणि रणवीर सिंग यांचे पात्र एकमेकांसमोर येतील का, हे अद्याप स्पष्ट नाही. मात्र विक्कीच्या वाट्याला काही जबरदस्त अ‍ॅक्शन सीक्वेन्स असणार, असं सूत्र सांगतात.

आणखी एक धक्कादायक माहिती म्हणजे विक्की कौशलने आपला भाग कथितरित्या गेल्यावर्षीच शूट करून ठेवला आहे, तोही पहिला ‘धुरंधर’ रिलीज होण्यापूर्वी. भविष्यातील चित्रपटांचा विचार करून आदित्य धर यांनी काही महत्त्वाचे सीन आधीच डिझाइन केल्याचं सांगितलं जात आहे. विक्की हा आदित्य धर यांचा आवडता अभिनेता मानला जातो, त्यामुळे पुढील भागांमध्ये त्याच्या भूमिकेला आणखी विस्तार मिळण्याचीही शक्यता आहे.

आदित्य धर आणि विक्की कौशल यांची प्रोफेशनल जर्नी 2019 मध्ये ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’पासून सुरू झाली. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर कमाई केली आणि चार राष्ट्रीय पुरस्कारही पटकावले. ‘उरी’नंतर दोघं ‘द इमॉर्टल अश्वत्थामा’ या महत्त्वाकांक्षी प्रोजेक्टमध्ये पुन्हा एकत्र येणार होते, पण मोठ्या बजेटमुळे तो चित्रपट थांबवण्यात आला. तरीही दोघांमधील प्रोफेशनल बॉन्ड कायम राहिला.

पहिला ‘धुरंधर’ रिलीज झाल्यानंतर विक्की कौशलने सोशल मीडियावर चित्रपटाची आणि दिग्दर्शकाची भरभरून तारीफ केली होती. इतक्या बारकाव्यांसह आणि भक्कम वर्ल्ड-बिल्डिंगसह चित्रपट बनवणं सोपं नसतं, असं त्याने म्हटलं होतं. यावर उत्तर देताना आदित्य धर यांनी विक्कीला “माझा धुरंधर” असं संबोधलं होतं.

सध्या विक्की कौशलच्या कास्टिंगबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नसली, तरी इंडस्ट्रीत सुरू असलेल्या चर्चांमधून तो ‘धुरंधर’ युनिव्हर्सचा महत्त्वाचा भाग ठरणार, हे जवळपास स्पष्ट होत आहे. आता फक्त मेकर्सकडून येणाऱ्या अधिकृत घोषणेची फॅन्स आतुरतेने वाट पाहत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

पैशांचा पाऊस पाडणार अक्षय कुमार; ‘Wheel Of Fortune’च्या ट्रेलरमध्ये उघड झाला करोडोंच्या इनामाचा खेळ

Comments are closed.