मोठी उलथापालथ! विराट कोहली टॉपच्या खुर्चीवरून आला खाली, इतिहास रचत ‘हा’ फलंदाज बनला नंबर-वन, रो

आयसीसी एकदिवसीय क्रमवारीतील बातम्या : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली अवघ्या एका आठवड्यानंतर आयसीसी वनडे क्रमवारीतील अव्वल स्थानावरून घसरला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वनडेत दमदार फलंदाजी करत कोहलीने नंबर वनची खुर्ची पटकावली होती. मात्र, आता न्यूझीलंडचा धडाकेबाज फलंदाज डॅरिल मिशेलने इतिहास रचत थेट अव्वल स्थानावर झेप घेतली. मिचेलने आपल्या वनडे कारकिर्दीतील सर्वोत्तम रेटिंग मिळवली असून तो आयसीसी वनडे क्रमवारीत मोठ्या फरकाने नंबर वन फलंदाज ठरला आहे.

डॅरिल मिशेल आयसीसी वनडे क्रमवारीत नंबर वन फलंदाज

भारत विरुद्ध न्यूझीलंड वनडे मालिका संपल्यानंतर आयसीसीने नव्या वनडे क्रमवारीची घोषणा केली. न्यूझीलंडचा स्टार फलंदाज डॅरिल मिशेल आता पहिल्या क्रमांकावर विराजमान झाला आहे. मागील आठवड्यात तो दुसऱ्या स्थानावर होता आणि अवघ्या एका रेटिंग पॉइंटने मागे पडला होता. मात्र, यावेळी त्याने केवळ विराट कोहलीलाच मागे टाकले नाही, तर मोठी आघाडीही घेतली आहे. सध्या डॅरिल मिशेलची रेटिंग 845 इतकी असून ही त्याच्या कारकिर्दीतील सर्वोच्च रेटिंग आहे. त्यामुळे लवकरच त्याला नंबर वनवरून हटवणे सोपे जाणार नाही.

विराट कोहलीचं शतक, तरी दुसऱ्या स्थानावर घसरण

विराट कोहली फक्त एका आठवड्यासाठीच नंबर वन राहिला. न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेतील अखेरच्या सामन्यात कोहलीने शतकी खेळी केली होती, तरीही टीम इंडियाला सामना आणि मालिका गमवावी लागली. याचाच परिणाम कोहलीवरही झाला असून तो आता आयसीसी वनडे क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर पोहोचला. सध्या कोहलीची रेटिंग 795 इतकी आहे, जी मागील आठवड्यात 784 होती. आगामी काळात कोहलीसाठी पुन्हा नंबर वन स्थान मिळवणे कठीण ठरू शकते, कारण वेळापत्रकानुसार तो थेट जुलैमध्येच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दिसणार आहे.

रोहित शर्मा देखील थेट चौथ्या स्थानावर घसरला

भारतीय संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मा यालाही या क्रमवारीत फटका बसला आहे. तो आता चौथ्या स्थानावर घसरला आहे. डॅरिल मिशेल आणि विराट कोहलीनंतर तिसऱ्या स्थानावर अफगाणिस्तानचा इब्राहिम झदरान पोहोचला असून त्याची रेटिंग 764 आहे. रोहित शर्माची रेटिंग सध्या 757 इतकी आहे. भारत-न्यूझीलंड वनडे मालिकेच्या सुरुवातीला रोहित नंबर वन होता, मात्र संपूर्ण मालिकेत त्याच्या बॅटमधून एकही अर्धशतक न निघाल्याने त्याला याचा फटका बसला. संपूर्ण मालिकेत रोहित केवळ 61 धावा करू शकला.

आयसीसी वनडे क्रमवारीतील टॉप 5 फलंदाज

डॅरिल मिशेल – 845 रेटिंग
विराट कोहली – ७९५ रेटिंग
इब्राहिम झद्रान – ७६४ रेटिंग
रोहित शर्मा – 757 रेटिंग
शुभमन गिल – ७२३ रेटिंग

हे ही वाचा –

Team India Playing XI 1st T20 vs New Zealand: ईशान किशन IN, तिलक वर्मा OUT; आज न्यूझीलंडविरुद्ध पहिला टी-20 सामना, अशी असेल टीम इंडियाची Playing XI

आणखी वाचा

Comments are closed.