आधी पोलिसांना धक्काबुक्की, मग थेट रोहित शर्माच्या अंगावर मारली झडप! हिटमॅनसोबत नेमकं काय घडलं?

रोहित शर्मा टीम हॉटेल व्हिडिओ : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक सामना इंदूरच्या होळकर स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा केवळ 11 धावा करून बाद झाला. मात्र, सामन्यानंतर घडलेल्या एका घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये एक महिला रोहित शर्माचा हात पकडून मदतीची विनंती करताना दिसत आहे. ही घटना तेव्हा घडली, जेव्हा भारतीय संघ टीम हॉटेलमध्ये प्रवेश करत होता. सुरक्षा घेरा तोडून ही महिला रोहित शर्मापर्यंत पोहोचली.

व्हिडीओमध्ये ही महिला सांगते की, तिने याआधीही माजी भारतीय कर्णधारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता, कारण तिची मुलगी एका गंभीर आजाराशी झुंज देत आहे. तिच्या उपचारासाठी अमेरिकेतून मागवण्यात येणाऱ्या तब्बल 9 कोटी रुपयांच्या इंजेक्शनची गरज आहे. महिलेने स्वतःची ओळख सरिता शर्मा अशी करून दिली.

ती म्हणाली, “माझी मुलगी अनिका गंभीर आजाराने त्रस्त आहे. तिचा जीव वाचवण्यासाठी 9 कोटी रुपयांच्या इंजेक्शनची आवश्यकता आहे. आम्ही छोट्या-छोट्या दान शिबिरांच्या माध्यमातून आतापर्यंत 4 कोटी 10 लाख रुपये जमा केले आहेत. मात्र आमच्याकडे वेळ फारच कमी आहे. भारत–न्यूझीलंड सामन्यादरम्यानही आम्ही क्रिकेटपटूंशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. स्टेडियममध्ये दान शिबिरही लावले, पण ते पुरेसे ठरले नाही.”

पुढे ती म्हणाली, “विराट कोहली आणि रोहित शर्मा हे नेहमीच गरजू मुलांना मदत करत असतात, म्हणून मी त्यांना भेटण्याचा प्रयत्न करत होते. आपल्या मुलीचा जीव वाचवण्यासाठी मी हतबल झाले होते. त्यामुळेच रोहित शर्मा ज्या हॉटेलमध्ये थांबले होते, तिथे गेले. भावनांवर नियंत्रण राहिले नाही आणि मी त्यांचा हात पकडला.”

या घटनेबद्दल महिलेने जाहीर माफीही मागितली आहे. ती स्पष्ट करते की, “मी तिथे सेल्फी काढण्यासाठी गेले नव्हते. मला फक्त माझ्या मुलीचा जीव वाचवायचा आहे. माझ्या या वर्तनाबद्दल मी प्रशासनाची आणि अधिकाऱ्यांची मनापासून माफी मागते. मला दुसरा काहीच मार्ग दिसत नव्हता. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना माझा संदेश पोहोचला, तर त्यांनी कृपया माझी मदत करावी,” अशी भावनिक विनंतीही तिने केली आहे.

हे ही वाचा –

ICC ODI Rankings : मोठी उलथापालथ! विराट कोहली टॉपच्या खुर्चीवरून आला खाली, इतिहास रचत ‘हा’ फलंदाज बनला नंबर-वन, रोहित शर्माला मोठा धक्का

आणखी वाचा

Comments are closed.