IND vs NZ: टीम इंडियाची विजयी सुरुवात! पहिल्या टी20 सामन्यात किवींचा दारुण पराभव
वनडे मालिकेतील पराभव विसरून भारतीय संघाने नागपूरमध्ये जोरदार पुनरागमन करत टी20 मालिकेला विजयी सुरुवात केली आहे. नागपूरच्या व्हीसीए स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या पहिल्या टी20 सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 48 धावांनी पराभव करत आपला दबदबा दाखवून दिला. या सामन्यात भारतीय विजयाचा नायक ठरला सलामीवीर अभिषेक शर्मा, ज्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं.
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीला उतरलेल्या टीम इंडियाची सुरुवात खराब झाली. संजू सॅमसन दुसऱ्याच षटकात 10 धावा करून बाद झाला, तर त्यानंतर ईशान किशनही केवळ 8 धावांवर तंबूत परतला. अवघ्या तीन षटकांत दोन विकेट्स गेल्यानंतर संघ अडचणीत सापडला होता. मात्र त्यानंतर अभिषेक शर्मा आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी डाव सावरत तिसऱ्या विकेटसाठी महत्त्वाची भागीदारी रचली.
अभिषेक शर्माने न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर अक्षरशः हल्ला चढवला. त्याने अवघ्या 35 चेंडूंमध्ये 84 धावांची तडाखेबंद खेळी केली. या खेळीत त्याने आठ षटकार आणि पाच चौकार खेचले. अभिषेक आणि सूर्यकुमार यादव यांनी दोघांनी मिळून 47 चेंडूंमध्ये 99 धावांची झंझावाती भागीदारी करत भारताला भक्कम स्थितीत नेलं. सूर्यकुमार यादव या सामन्यात सर्वोत्तम लयीत दिसला नाही, तरीही त्याने 32 धावांचं योगदान दिलं.
डावाच्या शेवटच्या षटकांत रिंकू सिंगने जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. रिंकूने केवळ 20 चेंडूंमध्ये चार चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर नाबाद 44 धावा केल्या. रिंकूच्या या फटकेबाजीमुळे भारताने 7 विकेट्स गमावून 238 धावांचा डोंगर उभा केला. हा भारताचा न्यूझीलंडविरुद्ध टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आतापर्यंतचा सर्वोच्च स्कोअर ठरला.
या सामन्यात आणखी एक मोठा विक्रमही नोंदवला गेला. भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांनी मिळून एकूण 428 धावा केल्या, जो या दोन संघांमधील टी20 सामन्यांतील सर्वाधिक एकत्रित स्कोअर आहे. याआधी हा विक्रम 2019 साली हॅमिल्टन येथे झालेल्या सामन्यात 420 धावांचा होता.
238 धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ 7 विकेट्स गमावून केवळ 190 धावांपर्यंतच मजल मारू शकला. भारतीय गोलंदाजांनी निर्णायक क्षणी विकेट्स घेत न्यूझीलंडला सामन्यापासून दूर ठेवलं. या दमदार विजयासह भारताने टी20 मालिकेत आघाडी घेतली असून, पुढील सामन्यांसाठी आत्मविश्वासही उंचावला आहे.
Comments are closed.